शिरोळ : टाकीची साफसफाई व पाईपलाईन ब्लॉकेज काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा मिथेन वायूमुळे गुदमरून मृत्यू नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.



शिरोळ तालुका प्रतिनिधी : 

शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील टाकीची साफसफाई व पाईपलाईन ब्लॉकेज काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा मिथेन वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास कारखान्याच्या मागील बाजूस पर्यावरण विभागात घडली. संदीप रमेश कांबळे (वय 38, रा. कुटवाड), राजेश यशवंत ठोमके (40, रा. उदगाव), गोपाळ सिद्राम जंगम (43, रा. औरवाड) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

दरम्यान, टाकीतील कारखाना प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने टाकी फोडून मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी कामगारांनी मोठी गर्दी केली होती.या घटनेनंतर तिघांनाही कारखान्याच्या दत्त आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. ही माहिती वार्‍यासारखी पसरल्याने दत्त कार्यस्थळावर नागरिकांसह मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. दत्त साखर कारखान्यात ही घटना दुसर्‍यांदा घडली असून कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी मृताच्या एका वारसाला कारखान्यात नोकरी आणि महाराष्ट्र राज्य कामगार कायद्यानुसार मिळणारी मदत देण्यात येईल, असे सांगितले.

सध्या गाळप हंगाम बंद असल्याने कारखान्याने पर्यावरण विभागाकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या टाक्या स्वच्छ करण्याबरोबर देखभालीचे काम सुरू केले आहे. प्रकल्पाच्या मुख्य टाकीतून जादा होणारे केमिकलयुक्त आणि मळीमिश्रित हिरवट रंगाचे पाणी हे एका टाकीतून मुख्य पंपाकडे पाठवले जाते. अनेक दिवस या टाकीचा वापर करण्यात आलेला नव्हता. तसेच टाकीच्या तळातून पंप हाऊसला जाणारे पाईप ब्लॉक झाले होते. त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी कामगार टाकीत उतरले होते.

पहिल्यांदा एक कामगार शिडीच्या सहाय्याने खाली उतरला. थोड्याच वेळात त्याचा श्वास गुदमरून तो जागीच कोसळला. तत्काळ दुसरा कामगार त्याला वाचवण्यासाठी शिडीवरून उतरत असताना त्याचा तोल जाऊन तोही खाली पडला. दोघांना वाचवण्यासाठी तिसरा कर्मचारी टाकीत उतरला. मात्र मिथेन वायूमुळे या तिघांचाही केवळ सात मिनिटात गुदमरून मृत्यू झाला. आपले तीनही सहकारी निपचित पडले असल्याचे चौथा कामगार हुसेन मुजावर याच्या लक्षात आले. त्याने तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही आपण गुदमरत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो पटकन बाहेर आला अन् बेशुद्ध पडला.

दरम्यान, आरडाओरडा झाल्यानंतर इतर कामगार घटनास्थळी आले. टाकीत पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र यश आले नाही. शेवटी सिमेंटची टाकी व त्यावरील जाड लोखंडी झाकण जेसीबीच्या सहाय्याने फोडून काढले. अर्जुनवाडचे कामगार प्रमोद मेडशिंगे व राजू रजपूत या दोघांनी तिघा कर्मचार्‍यांना खांद्यावरून बाहेर आणले.तत्काळ कामगारांना दत्त आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Post a Comment

Previous Post Next Post