पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 135 हॉस्पिटल्समध्ये 553 व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. तर केवळ 9 व्हेंटिलेटर वापराविना पडून असल्याचे आढळून आले आहे. हे व्हेंटिलेटर अन्य खाजगी रुग्णालयांना वापरासाठी उपलब्ध करून देता येतील.
शिरूर ग्रामीण रुग्णालयामध्ये 3, मावळ ग्रामीण रुग्णालय 2 आणि खेड तालुक्यातील चांदोली ग्रामीण रुग्णालयांमध्ये 2 व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत. तसेच सासवडमधील माने हॉस्पिटल मध्ये दोन व्हेंटिलेटर वापरत नसल्याचे दिसून आले. पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ज्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर मनुष्यबळ अथवा वापराविना पडून आहेत असे व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना उपयोगात आणण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना दिला होता, विभागीय आयुक्तांनी नियमावली करून त्यास परवानगी दिली होती.जिल्ह्याच्या ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये वापराविना पडून असलेल्या व्हेंटिलेटरची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने संकलित करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यात केवळ 9 व्हेंटिलेटर वापरावी पडून असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील 135 हॉस्पिटल्समध्ये व्हेंटिलेटर चा उपयोग केला जातो यामध्ये 100 व्हेंटिलेटर पुणे शहरातील आहे.
मनुष्यबळ किंवा अन्य कारणामुळे सुस्थितीत असलेली परंतु वापरात नसलेली नऊ व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांना देण्यास उपलब्ध होऊ शकतात. या व्हेंटिलेटर वापरापोटी दैनंदिन शुल्क आणि नियमावली तयार करण्यात आली आहे. आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलने या व्हेंटिलेटर ची मागणी केल्यास ते त्यांना वापरासाठी देता येतील
- आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे )