पुणे : पुणे जिल्ह्यात आज 442 रुग्णालयांना 4 हजार 455 रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यात आले. तर आतापर्यंत एकूण 590 खाजगी हॉस्पिटल्सना 53 हजार 9 इतका रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करणेत आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
मागील दोन दिवसात दि. 25 आणि 26 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्सीजन बेडच्या संख्येनुसार रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या व्हाईल देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोमेंट क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सलाचा समावेश आहे.
संबंधित कोविड रूग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रूग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे.याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.
पुणे जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दि. 11 एप्रिलपासून 24 X 7 रेमडिसिव्हीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडिसिव्हीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिव्हीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.