पुणे जिल्ह्यातील विविध भागात रेमडेसिवीर इंजेक्शनची जादा दराने विक्री करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून सहा इंजेक्शन, दुचाकी असा 1 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अक्षय राजेश सोनवणे (वय - 24, रा. गांधी चौक, दौंड), सूरज संजय साबळे (वय - 23, रा. शालिमार चौक, दौंड) आणि रोहन शेखर गणेशकर (वय - 29, रा. वाणेवाडी, ता. जुन्नर) अशी तिघांची नावे आहेत.
ग्रामीण भागात रेमडेसिवीर इंजेक्शनची जादा दराने विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काळ्या बाजारात इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते.आरोपी एका इंजेक्शनची विक्री 32 ते 45 हजार रूपयांना करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंडमधील हुतात्मा चौकात स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन इंजेक्शनसह 1 लाख 19 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
नारायणगावजवळ असलेल्या वारुळवाडीत एकजण इंजेक्शनची विक्री 45 हजार रूपयांना करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रोहन शेखर गणेशकर याला पकडले. त्याच्याकडून 3 इंजेक्शन, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात दौंड आणि जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, अमोल गोरे, शब्बीर पठाण, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांच्या पथकाने केली.