पुणे महानगरपालिका बाणेर येथे आणखी एक कोविड हॉस्पिटल साकारत आहे.. महापौर मुरलीधर मोहोळ



पुणे : शहरामधील वाढती कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास महापालिका सक्षम असून लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी यांच्या समन्वयाने पहिल्या कोरोना लाटेप्रमाणेच दुसऱ्या कोरोना लाटेवरदेखील नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने महापालिका उपाय योजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे महानगरपालिका बाणेर येथे आणखी एक कोविड हॉस्पिटल साकारत आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

बाणेर येथील सर्व्हे क्र.३३ येथे २०० बेड्सचे कोविड रुग्णालय साकारत असून याचा आढावा महापौर मोहोळ यांनी पदाधिकारी, अधिकारी आणि नगरसेवकांसमवेत घेतला. त्यानंतर ते बोलत होते. या कोविड रुग्णालयात १५० ऑक्सिजन बेड्स आणि ५० आयसीयू बेड्स असणार आहेत. कमीत कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु केले जाणार आहे. या पाहणी वेळी सभागृह नेते गणेश बीडकर, आयुक्त विक्रम कुमार, स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे हेही यावेळी उपस्थित होते.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, 'दुसऱ्या लाटेच्या काळात स्वाभाविकपणे कोरोना रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यादृष्टीने व्यवस्था व व्यवस्थापन वाढवण्याची जबाबदारी महापालिका कार्यतत्परतेने पार पाडत आहे. पहिल्या लाटेचा सामना करण्यासाठी बाणेर भागात अद्ययावत कोविड रुग्णालय महापालिकेने सुरू केले होते. एक वर्ष अत्यंत चांगली सुविधा व उपचार या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना देण्यात येत आहेत. महापालिकेचे हे एक मोठे यश असून समाधानाची बाब देखील आहे. त्याच धर्तीवर बाणेरमध्ये सर्व्हे क्र. ३३ येथे आता दुसरे कोविड हॉस्पिटल महापालिका उभारत आहे.

बाणेर येथील दुसरे कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असून लवकरच अद्ययावत २०० बेडचे हॉस्पिटल बाणेर भागामध्ये उभारले जाणार जाईल. हॉस्पिटल उभारणीसाठी आवश्यक तो सर्व निधी महापालिकेने तरतूद केला असून महापौर निधीतून देखील जवळपास १ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post