मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, तसेच कार्यालये मिळून १० ठिकाणी सीबीआयने आज सकाळी धाडी टाकून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली असून, अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात येत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा आरोप केला असून त्यांनी, हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून, लवकरच "दूध का दूध और पानी का पानी" होईल.अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, अजूनही अँटिलिया प्रकरणाचा छडा का लागला नाही, अशी विचारणाही मुश्रीफ यांनी केली आहे.
तसच पुराव्यांशिवाय अशी चौकशी होऊ शकते का? सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी चौकशी करणे, म्हणजे भाजपने सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी केलेले कटकारस्थान आहे, असा हल्लाबोल मुश्रीफ यांनी केला आहे.
१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची, सीबीआयने तब्ब्ल ११ तास चौकशी केलीय असून, त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.