इचलकरंजीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जवाहर साखर कारखान्याच्यावतीने कारखाना कार्यस्थळी ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. याद्वारे रोज 125 जंबो सिलेंडर उपलब्ध केले जाणार असून ज्यांना आवश्यकता भासेल त्यांना येथून ऑक्सिजन सिलेंडर भरुन देण्यात येतील, असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले.
तसेच कामगार कल्याण मंडळ येथील कोविड केअर सेंटरमध्ये 75 बेडची सर्व सुविधांनीयुक्त व्यवस्था असून त्यामध्ये 30 ऑक्सिजन बेड आणि 25 एनआयव्ही व्हेंटीलेटरची सुविधा असणार आहे. त्याचबरोबर आय.जी.एम हॉस्पिटल मधील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प व 25 एनआयव्ही व्हेंटीलेटरची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरु असून तो निश्चितपणे मिळेल, असे आवाहन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केले. देशात लसीकरणाची सरासरी 10 टक्के तर राज्याची सरासरी 22 टक्के असून इचलकरंजी शहराची सरासरी 42 टक्के इतकी आहे. लसीकरणासाठी गर्दी होत असल्याने आणखीन केंद्रे वाढविण्याची गरज आहे. सध्या 21 लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून आणखीन 29 केंद्रे मिळून एकूण 50 केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहे. स्वॅब तपासणीसाठी गर्दी होत असल्याने रुग्णालयातील लॅब रात्री 10 पर्यंत सुरु ठेवली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक किटसाठी राज्य व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करु, असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले. व्यंकटेश्वरा आणि तात्यासो मुसळे कोविड केअर सेंटरमध्ये आरटीपीसीआर चाचणी सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.