सध्याचा काळ हा जवळची माणसे वाढत्या प्रमाणात अचानक कालवश होण्याची बातमी देणारा अस्वस्थ कालखंड आहे.त्यातीलच हा आणखी एक धक्का. आकाशवाणीची मुलायम व रसपूर्ण 'वाणी ' म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख होती ते आकाशवाणीचे अधिकारी रियाज शेख २४ एप्रिल रोजी कालवश झाले. ते निवृत्त झाले होते पण त्यांच जाण्याच वय नव्हतं.एक वर्षानुवर्षाचा ज्येष्ठ कलावंत स्नेही गमावल्याच दुःख मोठं आहे.रियाजभाई हे उत्तम चित्रकार होते.साहित्य,कला,संस्कृती यांची अखंड जोपासना करणारे ते अव्वल दर्जाचे कलासक्त कलावंत व्यक्तित्व होत.जुन्या फर्निचर पासून ते चित्रपटांच्या पोस्टर पर्यंत अनेक गोष्टींचा संग्रह करणारे रियाजभाई माणूस म्हणूनही फार थोर होते. आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर त्यांनी काम केले.कार्यक्रम अधिकारी ते मुलाखतकार, निवेदक ते लेखक असे सर्वप्रकारे योगदान ते देत राहिले.त्यांनी ज्या ज्या केंद्रांवर काम केले त्या जिल्ह्यातील व विभागातील साहित्य,कला ,क्रीडा , राजकारण ,मनोरंजन,वैचारिक अशा सर्व प्रकारातील ज्येष्ठ व नवोदितांशी त्यांचा संपर्क होता. जे चांगलं आहे ते आकाशवाणीच्या श्रोत्यांपुढे गेलं पाहिजे ही बांधिलकी त्यांनी पहिल्यापासून स्वीकारली व निवृत्तीपर्यंत जोपासली.रियाजभाई एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होत.दृक वाहिन्यांच्या सुळसुळाटातही आकाशवाणी या श्राव्य माध्यमाकडे रसिकांना टिकवून ठेवण्यात ज्या अनेकांनी प्रयत्न केले त्यात रियाजभाई यांचा अग्रक्रमाने समावेश करावा लागेल.चॅनेल्स बदलण्यासाठी रिमोट ऐवजी बटण दाबून रेडिओ सुरू करावा असं अनेकांना रियाज शेख यांच्यामुळे वाटायच हे सत्य नाकारता येत नाही. ते आपल्या आवाजाच्या माध्यमातून चिरंजीव राहणार आहेतच.त्यांचा जो कलावस्तूंचा संग्रह आहे तो योग्य प्रकारे जतन करून वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून साकारणे ही त्यांना आदरांजली ठरेल.माणसं आणि वस्तू यांचा संग्राहक असलेल्या या ज्येष्ठ अवलिया रसिक कलावंताला विनम्र अभिवादन.
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)