हुपरी (वार्ताहर)
हुपरीत लसीकरण मोहीम जोरात सुरु असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने अतिशय शिस्तबध्द रितीने लोकांना लस देणेत येत आहे. हुपरी नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक स्वच्छताकार्य व कार्यालयीन मदत करणेत येत आहे.
मात्र स्थानिक व पंचक्रोशीतील कथीत फाळकूटदादांचा लसीकरण मोहीम यंत्रणेला खूप त्रास होत आहे. हुपरीतील नगरसेवकांचे तसेच लोकप्रतिनिधींचे गावातील व बाहेगावातील हस्तक, स्विय सचिव हे लसीकरण केंद्रात जाऊन त्याठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गावर दबाव आणत आहेत.
अगदी व्यवस्थित व शिस्तबध्दतेत सुरु असलेल्या लसीकरण कामात हे कथीत दादा लोक व्यत्यय आणण्याचे प्रकार करीत आहेत. सकाळ पासून नागरीक लसीकरणासाठी ओळीत थांबतात आणि हे फाळकूटदादा मध्येच आपल्या ''खास" माणसाला लस देण्यासाठी कर्मचारी लोकांना वेठीस धरतात. याआधी प्रकारामुळे लसीकरण केंद्रावर वरचेवर भांडणाचे प्रकार घडत असतात. विशेष म्हणजे हुपरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरच पोलिस स्टेशन असूनही या गंभीर गोष्टीपासुन पोलिस खाते अनभिज्ञ आहे.
येत्या १ मे पासून १८ वर्षे वयापासूनच्या सर्वांना लसीकरण करणेत येणार आहे त्याआधीच या युवा नेते व फाळकूटदादांचा बंदोबस्त करावा असे मत नागरीकांतून व्यक्त होत आहे.
हुपरीतील फाळकूटदादांच्या बरोबरीने आसपासच्या गावचे फाळकूटदादाही हुपरीच्या राजकारणात सक्रीय होत आहेत. स्थानिक राजकीय हस्तक व परगावचे राजकीय हस्तक यांचेमुळे हुपरीच्या राजकारणाला कोण दिशा देतय? हुपरीचे पालिका राजकारण कोण चालवतय हा संशोधनाचा विषय आहे.