हुपरी : येथील युवा चांदी उद्योजक सागर सुनील गाट (वय २७, रा. शांतीनगर) यांचा घरी रिव्हॉल्व्हरमधील गोळी लागून मृत्यू झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सागर यांचा मुलगा सिद्ध याच्या पहिल्याच वाढदिवशी ही दुर्दैवी घटना घडली. हुपरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून त्यानंतरच सागर यांचा मृत्यू अपघाती की आत्मघात हे आणि त्यामागील कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.
दरम्यान, इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, फॉरेन्सिक लॅब व ठसेतज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.मुलगा सिद्ध याच्या वाढदिवसानिमित्त पूजा विधी करण्यासाठी घरातील सर्व जण जैन बस्तीमध्ये गेले होते. सागर एकटेच घरी होते. दरम्यान, वडील सुनील घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या बेडरूममध्ये सागर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तसेच शेजाऱ्यांनी सागर यांना तातडीने रुग्णालयात हलविले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपअधीक्षक महामुनी यांनी तपासासाठी मार्गदर्शन केले. दरम्यान, कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर, पत्नी, मुलगा, आई, वडील व भाऊ यांच्यासमवेत शांतीनगर भागातील उच्चभ्रू, सुखवस्तू कुटुंबातील होते. ते, दंत चिकित्सक होते. पदवीनंतर त्यांनी चांदी व्यवसाय सुरू केला. त्यांनी वडील सुनील यांच्या पारंपरिक व्यवसायाची वाट धरली होती.
छातीत डाव्या बाजूला घुसली गोळी
पोलिसांना घटनास्थळी रिव्हॉल्व्हर आढळून आले आहे. रिव्हॉल्व्हरचा परवाना सुनील गाट यांच्या नावावर आहे. ती त्यांनी चांदी व्यवसायासाठी स्वसंरक्षणासाठी घेतली आहे. रिव्हॉल्व्हरमधून उडालेली गोळी सागर यांच्या छातीत डाव्या बाजूला घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी उडून सागर यांचा मृत्यू झाल्याचे वडील सुनील यांनी जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी रिव्हॉल्व्हरसह रक्त सांडलेला जमखाना जप्त केले. घटनास्थळी कान साफ करण्याचे 'ईअर बडस्' सापडल्याचे निरीक्षक मस्के यांनी सांगितले.