हुपरी (वार्ताहर)
हुपरीत मध्यवस्तीत असणाऱ्या बेकायदेशीर विनापरवाना खाजगी कोविड सेंटरबाबत हुपरी समाचारने सडेतोड आवाज उठविला होता. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या डॉ. सुकुमार गाटचे पितळ चांगलेच उघडे पडले. आणि अखेर हे कोविड सेंटर बंद करावे लागले.
डॉ. सुकुमार गाटच्या पाठीशी असणारी राजकीय ताकद हुपरी समाचारच्या वादळापुढे कमी पडली. अखेर डॉ.गाट याला आपला गाशा गुंडाळावा लागला.
हुपरीमध्ये जुन्या बस स्थानक परीसरात डॉ.सुकुमार गाट यांचे धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या ठिकाणी डॉ.गाट यांनी कोविड उपचारासाठी आवश्यक कोणतीही स्टॅण्डर्ड सुविधा नसताना विना परवाना कोविड सेंटर सुरू केले. भरवस्तीत हे सेंटर सुरु केल्याने नागरीकांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कोविड संबंधित कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नसलेले दिसून आले. काही नागरीकांनी हुपरी समाचारशी संपर्क करुन माहिती दिली. हुपरी समाचार मधून हे वृत्त प्रसिद्ध होताच शहरातून हॉस्पिटलबद्दल नगरपरिषद कार्यालयात तक्रारी जाऊ लागल्या. पाठोपाठ प्रांताधिकारी विकास खरात यांनी माहिती घेऊन सदर कोविड सेंटर बंद करण्याचे मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांना आदेश दिले.
त्याचबरोबर मुख्याधिकारी कुंभार यांनी सदर सेंटर बंद करून त्याठिकाणी असणाऱ्या कोविड रुग्णांची कोल्हापूरला शासकीय रुग्णालयात सोय करण्याचे आदेश दिले.
मागील कोविड काळात डॉ.सुकुमार गाट यांचे कोविड सेंटर प्रकरण खूपच गाजले होते. रुग्णाला त्याच्या खात्यावरील पैसे आपल्या खात्यावर ट्रान्स्फर करण्यासाठी केलेले दबावतंत्र खूपच गाजले होते. सद्याच्या कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होताच ३०हजार रुपये रक्कम भरुन घेऊन नंतर भरमसाठ औषधे लिहून देण्याच्या प्रकारातून डॉ.सुकुमार गाट यांनी चांगलेच मिटर पाडले आहे.
दरम्यान धनदांडग्या शक्तीच्या जोरावर विनापरवाना कोविड सेंटर उभे करून भरवस्तीत कोरोना फैलावापासून नागरीकांची मुक्तता झाली असून हे हुपरी समाचारचे मोठे यश आहे.