राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली परवानगी घेऊन खासगी व्यक्तींचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कठोर कारवाई होणार ,



 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गुप्तवार्ता आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान केले. त्या रश्मी शुक्ला यांच्या अहवालात कोणतेही तथ्य नसल्याचा अहवालच मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी जे पेन ड्राइव्ह थेट दिल्लीत जाऊन दाखवले. तो पेनड्राइव्हमधील अहवाल सरकारचे टॉप सिक्रेट असतानाही त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने संशयाची सूई थेट रश्मी शुक्ला यांच्यावरच जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली परवानगी घेऊन खासगी व्यक्तींचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे.विशेष म्हणजे ज्या काळात फोन टॅपिंग करण्यात आले त्या काळात कोरोना असल्याने एकही बदली झाली नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाल्याने विरोधकांचे आरोप धादांत खोटे ठरले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बदली प्रकरणात कोटय़वधी रुपयांचा व्यवहार झाल्याच अहवाल रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यामार्फत सरकारला दिल्याचे म्हटले होते. या अहवालावर सरकारने कोणतीच कारवाई केली नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज दिलेल्या अहवालाने सर्व दावे फोल ठरले आहेत. रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी सुबोध जयस्वाल यांना अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल तत्कालीन गृह सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे 26 ऑगस्ट रोजीच आला. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी तपासून तो सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार 31 ऑगस्ट 2020 रोजी तो अहवाल तपासून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. या अहवालावर तत्कालीन गृहसचिव सीताराम कुंटे यांनी अभिप्राय नोंदवला होता.

बदल्यांची वस्तुस्थिती

  • 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या काळात भा. पो. से. च्या 167 अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या. 4 अपवाद वगळता सर्व बदल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवर झाल्या होत्या.
  • सप्टेबर 2 ते 28 ऑक्टोबर 2020 कालावधीत 154 पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या. पैकी 140 बदल्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीने तर 10 पदस्थापनेतील बदल सुचवून झाल्या.

31 मार्च 2020 ते 22 जानेवारी 2021 या काळात राज्य सेवेतील 83 पोलीस अधिक्षकांच्या, 186 उपअधिकांच्या, 96 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यातील 9 बदल्या वगळता सर्व आस्थापना मंडळाच्या शिफारशीने झाल्या आहेत.

शिफारशीनुसारच बदल्या

पोलीस उपअधीक्षक व त्यापेक्षा उच्च दर्जाच्या सर्व पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या या मुंबई पोलीस अधिनियमा अंतर्गत. पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार करण्यात येतात. त्यानुसार सर्व बदल्या या पोलीस अस्थापना मंडळाच्या शिफारशीच्या आधारे शासनाने केल्या. त्यावेळच्या आस्थापना मंडळात तत्कालीन मुख्य सचिव गृह सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस आयुक्त परमवीर सिंह, पोलीस महासंचालक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रजनीश सेठ, अप्पर पोलीस महासंचालक सदस्य सचिव कुलवंत कुमार सरंगल यांचा समावेश होता.

रश्मी शुक्ला यांनी अशी केली दिशाभुल

रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्याची शक्यता वर्तवून काही व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली. ज्याच्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करून इंडियन टेलिग्राफ अॅक्टखाली परवानगी घेतली. मात्र या कायद्यानुसार देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचविणाऱया कृत्यावर नजर ठेवता यावी व वेळीच असे षडयंत्र मोडून काढणे याकरता परवानगी देता येते. राजकीय मतभेद, व्यावसायिक तंटे, कौटुंबिक कलह अशा स्वरूपाच्या प्रसंगामध्ये या तरतुदीचा वापर करता येत नाही. मात्र रश्मी शुक्ला यांनी मूळ उद्देशापेक्षा वेगळ्या कारणांसाठी उपरोक्त तरतुदींचा गैरवापर केला व त्याकरिता शासनाची दिशाभूल केली.

Post a Comment

Previous Post Next Post