इचलकरंजी - शहरात कोरोनाचा पुन्हा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखावयाचा असेल तर सर्वांनी शासन निर्देशांचे पालन करण्यासह प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेली लस न चुकता घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. ॲड सौ अलका स्वामी यांनी केले.
शुक्रवारी नगराध्यक्षा ॲड सौ. अलका स्वामी (वहिनी ) आणि राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी नगरपरिषदेच्या चांदणी चौक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून लस घेतली. यावेळी आरोग्य सभापती संजय कैगार मा नगरसेवक दिलीप मुथा, संग्राम स्वामी, राहुल जानवेकर आरोग्य निरक्षक विजय पाटील आरोग्य केंद्रातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी, शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह नगरपरिषदेच्या जवाहरनगर, लालनगर, चांदणी चौक (गावभाग), कलावंत गल्ली, तांबेमाळ व शहापूर या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु आहे. लस संदर्भात अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. पण ही लस अत्यंत सुरक्षित असून त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ज्येष्ठ नागरिकांनी प्रथमत: लस घ्यावी. तर आता शासनाने 45 वर्षावरील सर्वांना लस घेण्यास मंजूरी दिली असल्याने न घाबरता सर्वांनी नजीकच्या लसीकरण केंद्रात जावून लस घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी केले आहे.