पुणे : शुक्रवारी रात्री पुण्यातील फॅशन स्ट्रीटवर लागलेल्या भीषण आगीनं तब्बल दोन तास अक्षरश: तांडवं माजवलं होतं. रात्री पावणे अकराच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात त्याठिकाणी बघ्यांची गर्दी असल्याने आग विझवण्यात अढथळा येत होता.
पुण्यातील एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागल्याने माहिती मिळताच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहोचले होते.अग्निशमन दलाने तब्बल 16 बंब वापरून दोन तासात ही आग आटोक्यात आणली. पिंपरी चिंचवडच्याही फायर ब्रिगेड गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. साधारण मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आलं होतं. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होतं. दरम्यान या आगीचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
अशाप्रकारे फॅशन स्ट्रीटवर आग लागल्याचा फोन अग्निशमन दलाला साधारण 10 वाजून 58 मिनिटांनी आला होता. या दुर्घटनेत अद्यापपर्यंत तरी कोणतीही जीवीत हानी झाल्याचं वृत्त नाही. पण या कँम्प परीसरातील या फेमस फॅशन स्ट्रीटवरील लहानमोठी तब्बल पाचशेहून जास्त दुकानं जळून खाक झाली आहेत. त्यात छोट्यामोठ्या व्यापाऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. सुदैवाची बाब म्हणजे ही आग आजबाजुच्या दाट लोकवस्ती इमारतींपर्यंत न पोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पण फॅशन स्ट्रीटवरील कित्येक दुकानदारांचा करोडोंचा माल आगीत जळून खाक झाला आहे.