पुणे - पुणे, पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच ग्रामीण भागातही करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. यामध्ये एक एप्रिलपर्यंत लॉकडाऊन नाही, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.परंतु, पुणेकरांनी नियमांचे काटेकोर पालन केले नाही, तर पुण्यात २ एप्रिलला कठोर निर्णय घेऊ, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवारासोबतच्या बैठकीत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला दिला गेला आहे.
'हे' आहेत अजित पवारांच्या बैठकीतील ठळक मुद्दे :
- 1 एप्रिलपासून पुण्यातील सर्व खासगी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे
- 50 पेक्षा अधिक संख्या लग्नाला उपस्थित नको, असं आवाहन करण्यात आलं आहे. 20 लोकांमध्ये अंतविधी करावेत.
- शाळा महाविद्यालय 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार.
- संध्याकाळी सर्व बाग बंद राहणार.
- जम्बो कोव्हिडमधील सुविधा वाढवण्याचा निर्णय.
- पिंपरीचं जम्बो कोव्हिट सेंटर सुद्धा सुरू करणार.
- ससून रुग्णालयात 500 बेडपर्यंत संख्या वाढवणार.
- बोर्डाच्या परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणेच होणार आहेत.
- सामूहिक होळी साजरी न करण्याचं आवाहन
तसेच पुढच्या शुक्रवारी आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुण्यात 1 एप्रिल ते 14 एप्रिल काळात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी प्रशासन करत होते. मात्र, अजित पवारांसह आयएएस अधिकाऱ्यांनी त्यास विरोध दर्शविल्याने १ एप्रिलआधी आणखी एक बैठक घेण्याचे ठरले आहे. यामुळे तुर्तास पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले .