पुणे - कॅम्प मधील फॅशन स्ट्रीट भागात शुक्रवारी रात्री आगीने तांडव घातले. या ठिकाणी असलेल्या दुकानांना रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की लुल्लानगरच्या टेकडी वरून ती दिसत होती. या ठिकाणी कपडे तसेच साहित्याची 500 हुन अधिक दुकाने आहेत.
रात्री 10 वाजून 58 मिनिटांनी अग्नीशमन दलास या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर अग्नीशमन दलाच्या 14 गाड्या आणि 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी पाठविण्यात आले. रात्री उशीरा पर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते मात्र, कापड दुकानाची संख्या अधिक असल्याने आग वाढतच होती.
या बाबत माहिती देताना अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे म्हणले की, माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल तातडीनं घटना स्थळी पोहचले मात्र आग मोठी असल्याने आधी या ठिकाणच्या आसपासच्या घरामधील नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे.अद्याप कोणतीही जिवित हानी झालेली नसली तरी आग नियंत्रणात आल्यानंतर त्याबाबत सांगता येणार आहे.
या घटनेनंतर या ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी झाली असून त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले असून त्यांनी तातडीनं अग्निशमन दलाकडून घटनेची माहिती घेतली आहे.