माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' बंगल्यावर बोलविलेल्या महत्त्वाच्या बैठकीत रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. मात्र राज्य सरकारकडून रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भाजपकडून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असून या षडयंत्रात राज्यातील वरिष्ठ अधिकारीही सामील आहेत.माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग व रश्मी शुक्ला यांनी केलेली कृती हीदेखील या कटाचा भाग होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी या बैठकीस उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर 'सह्याद्री'वर झालेल्या बैठकीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी काही मंत्र्यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही कारवाईची मागणी केली. भाजप सरकार महाविकास आघाडीची बदनामी करीत असून काही अधिकारी भाजपला साथ देत असल्याचे काही मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे परमबीर सिंग व रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव व गृह विभागाचे अपर मुख्य सचिवांनी फोन टॅप करण्याची परवानगी दिली होती का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्धी माध्यामांशी संवाद साधला. रश्मी शुक्ला या पोलिस अधिकारी आहेत म्हणून कोणाही नागरिकाचा फोन टॅप करू शकत नाहीत. त्यासाठी नियम व कायदे आहेत. रश्मी शुक्ला यांनी एका अधिकाऱयाचा फोन टॅप करण्याची परवानगी मागितली आणि दुसऱया अधिकाऱयाचे फोन टॅप केले असे आव्हाड म्हणाले.
तेच पत्र वापरून सरकारची बदनामी
वास्तविक फोन टॅप करण्यासाठी गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागते. रश्मी शुक्ला यांनी तशी परवानगी घेतली नसल्याचे सीताराम कुंटे यांनी बैठकीत सांगितले. रश्मी शुक्ला यांनी लिहिलेले पत्र उघड झाले तेव्हा त्यांनी माफी मागितली. त्यामुळे सरकारने दया दाखवत सौम्य भूमिका घेतली. आज तेच पत्र वापरून सरकारची बदनामी केली जात असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आशुतोष कुंभकोणी यांच्याशी सल्लामसलत
मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत फोन टॅपिंग संदर्भात कोणती कारवाई करावी याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांच्याशीही सल्ला मसलत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.