. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन जाहीर




कोरोनाच्या दुसऱया लाटेने उग्र स्वरूप धारण केले असून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन आठवडय़ांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी लोकांच्या मुक्त संचारावर कठोर निर्बंध अर्थात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आली आहे.

राज्य सरकारने शनिवार मध्यरात्रीपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश जारी केले आहेत. या काळात चित्रपटगृहे, मॉल आणि उपाहारगृहे, तसेच उद्याने, चौपाटय़ांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवावी लागणार आहेत. 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध असतील. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.विनामास्क फिरणाऱया व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांची बैठक घेऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता.

या बैठकीनंतर रविवारपासून संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत राज्याच्या महसूल आणि वने आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतचे लेखी आदेश व मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. हे आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.

कोरोना बाधितांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित वैद्यकीय यंत्रणेला त्याची सूचना देऊन संबंधित व्यक्तीला होम क्वारंटाइन करावे. कोविडबाधित असल्याचा फलक इमारतीच्या दर्शनी भागात चौदा दिवस लावावा. होम क्वारंटाइनचा शिक्का संबंधित व्यक्तीच्या हातावर स्थानिक प्रशासनाने मारावा. घरातील एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तींनी शक्यतो घराबाहेर जाऊ नये. तसेच मास्कचा वापर करावा. होम क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाने कोरोनाबाधित व्यक्तीला त्वरित कोविड सेंटरमध्ये दाखल करावे.

जमावबंदी लक्षात ठेवा…

पाच जणांच्यावर फिरताना आढळल्यास प्रत्येकाकडून 1 हजार रुपयांचा दंड

काय आहे नवीन नियमावली

रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही. जमावबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड.
सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, चौपाटय़ा रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत बंद. आदेशाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड.
विनामास्क फिरल्यास 500 रुपये दंड
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड.
सर्व चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, मॉल, ऑडिटोरियम, रेस्टॉरंट रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत बंद. नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत बंद ठेवावी लागतील. मात्र या वेळेत घालून दिलेल्या नियमानुसार होम डिलिव्हरीला परवानगी असेल.
सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी. सभागृहे किंवा नाटय़गृहांचा उपयोग या कारणांसाठी करता येणार नाही.
लग्नसोहळय़ात पन्नासपेक्षा अधिक लोकांना उपस्थितीची परवानगी नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास कोरोना संपेपर्यंत लग्नसोहळय़ासाठी वापरण्यात येणारी ठिकाणे बंद ठेवावी लागतील.
लोकप्रतिनिधी वगळता सरकारी कार्यालयांत व्हिजिटर्सना बंदी. तातडीचे काम असल्यास नियोजित वेळ घेऊन विभागप्रमुखांकडून परवानगी आवश्यक.
धार्मिक स्थळांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याचे नियोजन करावे. धार्मिक स्थळांवर येणाऱयांसाठी ऑनलाइन आरक्षणावर भर द्यावा.
या काळात सार्वजनिक वाहतूक सुरू राहील. मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित यंत्रणेकडून 500 रुपये दंड आकारण्यात येईल.

फक्त 44 टक्के लोक मास्क वापरतात

पेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांची बैठक घेतली. यात अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. 12 राज्यांतील 46 जिल्हय़ांमध्ये नवीन रुग्णांची टक्केवारी 71 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 69 टक्के आहे. देशभरातील 90 टक्के लोकांना मास्क वापरण्याचे ठाऊक आहे, पण प्रत्यक्षात 44 टक्के लोकच मास्क वापरतात. कोरोनाबाधित रुग्ण मोकाट राहिला तर 30 दिवसांत तो तब्बल 406 जणांना कोरोना देऊ शकतो.

होळी रे होळी… कोरोनाला देऊ फुट्टासची गोळी!

यंदाच्या होळी, रंगपंचमीवरही कोरोनाचे सावट असल्याने उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क पीपीई किट घालून धारावी आणि शीवमधील झोपडपट्टीबहुल भागांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.

'नका खेळू होळीचे रंग, अजून बाकी आहे कोरोनाशी जंग' असा संदेश याद्वारे देण्यात आला. तसेच होळी-शिमगा सणाच्या निमित्ताने पालखीची मिरवणूक काढू नये, मंदिरातच दर्शनाची व्यवस्था करावी. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post