मुंबई: मराठीपणाची ओळख ठसवण्यासाठी प्रत्येकाने मराठीतच सही केली पाहिजे, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले. माझा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांवरही माझी सही ही मराठीतच आहे. तुम्हीदेखील यापुढील काळात मराठीत सही करा. मराठी भाषेसाठी नुसती आसवं गाळून फायदा नसतो. मराठी ही प्रत्यक्षात जगावी लागते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: येऊन सही केली. यामध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होणार आहेत.
राज ठाकरेंच्या आवाहनला लतादीदींचा प्रतिसाद
राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त एक पत्र लिहून लोकांना व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांच्या या आवाहनाला गानकोकिळा लता मंगेशकर यांनी प्रतिसाद दिला होता. लता मंगेशकर यांनी राज ठाकरे यांना संत ज्ञानेश्वर यांचे एक चित्र पाठवले होते. या छायाचित्राच्या शेजारी लता मंगेशकर यांनी मराठीत सही केली होती. याबद्दल राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांचे ट्विटवरुन जाहीर आभार मानले.
बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का, मनसेचा शिवसेनेला टोला
राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असून मनसे नेत्यांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटिसा पाठवल्या होत्या. तरीही मनसे कार्यक्रम घेण्यावर ठाम होती. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असा खोचक टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला.