बर्ड फ्ल्यू चे देशातील अनेक भागात थैमान.

 देशात अनेक भागात बर्ड फ्लू ने थैमान घातले आहे.


PRESS MEDIA LIVE : 

कोरोना पाठ सोडत नाही तोच देशाच्या अनेक भागांत बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. आतापर्यंत लाखो पक्ष्यांचा बर्ड फ्लूने बळी घेतला आहे. कावळे, चिमण्या, बदके, किंगफिशर, मोर आणि स्थलांतरीत पक्ष्यांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची लागण झालेले पक्षी जीव गुदमरल्यामुळे आकाशातून खाली कोसळून मरू लागले आहेत. हा बर्ड फ्लूच असल्याचे निदान निघाल्याने पशूतज्ञांचीही झोप उडाली असून त्याची लागण माणसांना होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. माणसांच्या सर्वाधिक संपर्कात येणाऱ्या कोंबड्या सांभाळा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राजस्थानात अचानक हजारो कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली होती.त्या कावळ्यांना संसर्गजन्य बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकार हैराण झाले. केंद्र सरकारने राजस्थानसह देशातील सर्वच राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला होता. राजस्थानातील कोटा, झालवार, बरा आणि जोधपूरमध्ये हजारो कावळे मृतावस्थेत सापडले. काही ठिकाणी किंगफिशर आणि मॅगपाईज चिमण्यांचाही मृत्यू झाल्याचे आढळल्याची माहिती राजस्थानचे मुख्य सचिव पुंजीलाल मीना यांनी दिली.

केरळमध्ये 50 हजार बदकांची कत्तल

केरळमधील अलाप्पुझा आणि कोट्टयम या जिह्यांमध्ये बदकांमध्ये बर्ड फ्लू आढळल्याने हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. रोग पसरू नये म्हणून या जिह्यांमधील 50 हजार बदकांची कत्तल करण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई देण्यात आली आहे, असे पशुपालन मंत्री के. राजू यांनी सांगितले. अचानक मृत्युमुखी पडलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळल्याची माहिती भोपाळच्या पशू रोग संशोधन संस्थेने दिली आहे. यापूर्वी 2016मध्ये केरळच्या अल्लापुझा आणि पथनमथिट्टा जिह्यांमध्ये दोन लाख कोंबड्या आणि बदकांची कत्तल करावी लागली होती.

हिमाचलात 1800 स्थलांतरीत पक्षी मृतावस्थेत

हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील पोंड डाम सरोवरात 1800 स्थलांतरीत पक्षी मृतावस्थेत आढळले. त्यांचे नमुने चाचणीसाठी बरेली येथील व्हेटरीनरी रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये पाठवण्यात आले होते. त्यांच्यात बर्ड फ्लूचे विषाणू आढळले.


मध्य प्रदेशात नागरिकांची तपासणी सुरू

मध्य प्रदेशातील इंदूर येथे मृतावस्थेत आढळलेल्या 50 कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळला आहे. तसेच कालवा गावात 50 मोरही आजारी पडले आहेत. दिडवाना येथे पाच कबुतरेही मृतावस्थेत आढळली. स्थानिक प्रशासनाने इंदूरमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे नागरिकांमध्ये आढळतात का याचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

बर्ड फ्लू हा पक्ष्यांना होतो. पण त्या पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांनाही त्याची लागण होऊ शकते आणि नंतर तो मानवामध्ये पसरू शकतो. बर्ड फ्लूचे विषाणू विविध प्रकारचे आहेत. त्यातील एच-7 जातीचा विषाणू हा अत्यंत घातक समजला जातो. बर्ड फ्लूचा विषाणू हा एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरीत पक्ष्यांच्या मार्फत पसरू शकतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून दिली जाते.

Post a Comment

Previous Post Next Post