सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक व साताऱ्याच्या तत्कालीन एसपी तेजस्वी सातपुते यांच्या विरोधात राजेंद्र चोरगे यांनी केलेल्या तक्रारीची दखल. चौकशी होणार.
सातारा - सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक व सातार्याच्या तत्कालीन एसपी तेजस्वी सातपुते यांच्याविरोधात सातार्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने दि.14 जानेवारीला निवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्यासमोर एसपी तेजस्वी सातपुते यांना चौकशीकामी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रारदार चोरगे यांनाही उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांच्याशी संबंधित एक घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. त्यामध्ये एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यांनी बेकायदेशीर काम केल्याचा चोरगे यांचा आक्षेप होता.त्याबाबत त्यांनी तत्कालीन पाेलिस अधीक्षकांकडे तक्रारीदेखील केल्या होत्या.
मात्र,त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संबंधित अधिकार्याला पाठीशी घातल्याची भावना झाल्याने चोरगे यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. चोरगे यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने दि.14 जानेवारी रोजी एसपी सातपुते यांना निवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्या खंडपीठासमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे आयपीएस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हे प्राधिकरण मुंबईत कार्यरत असून, तिथे वर्षाकाठी ३०० हून अधिक तक्रारी येतात. सर्वसामान्य नागरिक एका पानावर तक्रार नोंदवून ती वेबसाइटवर असलेल्या प्रतिज्ञापत्राच्या मसुद्याप्रमाणे टपालाद्वारे एसपीसीएच्या कार्यालयात पाठवू शकतो. एसपीएसचे कामकाज सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चालते. राज्यभरात १५१ अधिकारी एसपीसीएचे कामकाज सांभाळतात.
पोलिसांकडून धमकी देणे, मानसिक वा आर्थिक तसेच शारिरीक छळ करणे, बेकायदेशीर अटक करणे, तक्रारीची दखल न घेणे, विनाकारण चौकशी करणे अथवा तशी धमकी देणे, तपासाबाबत संशय असल्यास नागरिक एसपीसीएकडे दाद मागू शकतात. त्यात दोषी आढळल्यास संबंधितावर थेट कारवाई होऊ शकते.