सातारा - जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार मानले जात असलेल्या आनेवाडी येथील टोलनाक्यावर बेकायदेशीर जमाव जमवून टोलनाक्यावरील स्थानिक कामगारांचा व दिवाळी बोनसचा मुद्दा तसंच टोल वसुलीचा अधिकार कोणाला देणार नाही असे सांगत टोल हस्तांतरणास विरोध केल्याप्रकरणी दाखल वाई न्यायालयातील खटल्यातून भाजपाचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांची अन्य 11 जणांसह निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे. उदयनराजे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
दिनांक 5 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळी टोल नाका हस्तांतरप्रकर्णी खासदार उदयनराजे यांच्यासह अशोक सावंत, अजिंक्य मोहिते, मुरलीधर भोसले, सनी भोसले, सुजित आवळे, राजू गोडसे, किरण कुराडे, इम्तियाज बागवान, बाळासाहेब ढेकणे, विवेक उर्फ बंडा जाधव आदींनी जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेशाचे यावेळी 250 हून अधिक जणांच जमाव गोळा झाला होता आणि टोलनाक्यावरील वातावरण तंग झाले होते.
यावेळी टोलनाक्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याबाबत भुईज पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनाजी तानाजी कदम यांनी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याची तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी वाई येथील न्या एम एन गिरवलकर यांच्या न्यायालयात झाली.
या सुनावणीदरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम सुनावणीनंतर उदयनराजे व त्यांच्या सहकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सुनावणीसाठी न्यायालयात खासदार उदयनराजे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. सरकारी पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी तर उदयनराजे व इतरांच्या वतीने वकील ताहेर मनेर यांनी काम पाहिले.