मांजरी – सीरम इन्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग पूर्णपणे विझल्यानंतर आत जाऊन पाहिले असता वरच्या मजल्यावर पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. रात्री अंधार असल्याने काही अंदाज येत नसल्याने अग्निशमन दलाचे जवान सकाळी पुन्हा पाहणी करणार आहेत. यादरम्यान, या दुर्घटनेतून वाचलेला अविनाश कुमार याने या घटनेबाबत माहिती दिली.
उडी मारल्याने तो बचावला आहे. परंतु, आगीतून वाचलेल्या अविनाशकुमार सरोज याने आपला भाऊ आगीत गमावला आहे. भावासोबत तो देखील इमारतीत होता. अविनाश याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. पण, त्याचा भाऊ बिपीनकुमार सरोज (रा. उत्तर प्रदेश) हा खाली आलाच नाही.
अविनाश याने सांगितले की, आम्ही ठेकेदारामार्फत येथील इमारतीमध्ये काम करीत होतो. आज, दुपारी दोनच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून धूर येत असल्याचे दिसले. तर, काही वेळाने आगीचे लोट इमारतीच्या खिडक्यांत दिसू लागले. सगळीकडे धूर आणि काही खिडक्यांतून आग मोठ्या प्रमाणात भडकली असल्याचे दिसू लागले. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी आमच्या सर्वांची पळापळ सुरू झाली.
मी भावाला “भाई चलो जल्दी’ असे ओरडून सांगत होतो. त्याला ओढतच निघालो होतो. आग भडकू लागल्याने आम्ही तेथून पांगलो. त्याचवेळी मला खिडकी दिसली, तेथून धूर येत होता. पण, आग दिसत नव्हती त्यामुळे मी त्या खिडकी जवळ धावत गेलो. मी तिसऱ्या मजल्यावरील होतो.
पण, जीव वाचवायचा असेल तर तेथून उडी मारण्याशिवाय पर्याय नसल्याचे कळाल्याने मी काहीही विचार न करता खाली उडी मारली. तेथे खाली असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर मी पडलो. पण, माझा जीव वाचला. त्यानंतर मी माझ्या भावाचा शोध घेतला. पण, तो दिसलाच नाही, असे सांगताना अविनाशकुमार याच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते.