पुणे - महापालिकेच्या शिक्षण विभागातून सेवानिवृत झाल्यानंतरही जवळपास सहा महिने वेतन घेणारे आणखी सहा कर्मचारी आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेतील ही वेतन घोटाळ्याची व्याप्ती वाढतच असल्याचे चित्र आहे. दरम्यान, याप्रकरणी जबाबदार असलेल्या व्यक्तींना पालिकेकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. यापूर्वीच वेतन सुरू असलेले असे 19 कर्मचारी आढळून आले होते. याप्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना 15 दिवसांसाठी निलंबित केले होते. त्यांचा निलंबनाचा कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस आधीच हा प्रकार समोर आला आहे.
महापालिकेचे शिक्षण मंडळ हा स्वतंत्र विभाग होता. त्यानंतर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यशासनाने शिक्षण मंडळ बरखास्त करत त्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपविली असली तरी, अद्यापही या विभागाच्या रेकॉर्डचे अपडेशनत्यामुळे शिक्षण विभागातील अनेक धक्कादायक प्रकार पालिकेकडून रेकॉर्ड अपडेट करताना समोर येत आहे.
तीन आठवड्यांपूर्वी शिक्षण विभागातील 19 जणांना सेवानिवृत्तीनंतरही वेतन दिले जात असल्याचे समोर आले. याप्रकरणी पालिकेने चौकशी केली असता त्यात 9 कर्मचारी दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून आणखी 6 जणांना सेवानिवृत्तीनंतरही वेतन देण्यात आल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांमध्ये 4 जणांना तब्बल सहा महिने वेतन देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून याप्रकरणी 5 जणांना नोटीस बजावल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
'त्या' कर्मचाऱ्यांकडून वसुली करणार
प्रशासनाकडून सेवानिवृत्तीनंतरही वेतन मिळत असतानाही या वेतन घेणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांकडून याची कल्पना प्रशासनास देण्यात आली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, तर ही बाब निदर्शनास येऊनही शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वेतन सुरूच ठेवले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून या वेतनाची वसुली केली जाणार असून संगनमताने हा प्रकार झालेला असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.