पुरावे द्या चौकशी करतो.


पुरावे द्या चौकशी करतो.. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार.


PRESS MEDIA LIVE : पिंपरी : 


पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये बरेच काही 'चालू' असल्याचे सातत्याने कानावर येत आहे. बोगस 'एफडीआर' प्रकरणाबाबत केवळ माहिती न देता त्याचे पुरावे द्या, मी महापालिकेतील कारभाराची चौकशी लावतो, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) दिला. उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपासमोरील अडचणी वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना प्रातिनिधिक स्वरुपात 'हेल्थ-365′ स्मार्ट व्हायटल बेल्ट व स्पोर्ट सायकलचे वितरण करण्यात आले.तसेच ग्राम सुरक्षारक्षक दलाच्या सदस्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी कोविडच्या काळात केलेली अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उजेडात आणली आहे. त्याबाबत आयुक्तांकडे तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्याशिवाय महापालिकेमध्ये ठेकेदारी करणाऱ्या काही ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक करत बोगस एफडीआर सादर केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. यानंतरही ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. याबाबत विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना पवार यांनी वरील इशारा दिला.

पवार म्हणाले की, महापालिकेच्या कारभारामध्ये बरेच काही सुरू आहे. बरेच काही कानावरही पडत आहे. मात्र केवळ कानावर येऊन अथवा माहिती देऊन चालणार नाही. त्यासाठी पुरावे आवश्‍यक आहे. महापालिकेतील चुकीच्या कारभाराबाबत पुरावे दिल्यास आपण तात्काळ चौकशी लावू. अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे सत्ताधारी भाजपाचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे पालिकेत सध्या अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहे. अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक ते ठेकेदार अशी साखळी निर्माण झाल्याने या साखळीच्या माध्यमातून शेकडो कोटींची कामे बिनबोभाट सुरू आहेत. आता अजित पवारांनी पुरावे मागत चौकशीची घोषणा केल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे पुढील वर्ष बिकट असल्याचीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

कोविड प्रकरणाची माहिती पुरविणार
महापालिकेमध्ये कोविडच्या कालावधीत खरेदीसह कोविड सेंटर चालविण्यामध्ये अनेक 'कारनामे' झाल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्याने आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. पुरावेही सादर केले होते. त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आता अजित पवारांनी आज शहरात आल्यानंतर पुराव्याबाबत केलेल्या घोषणेनंतर या कार्यकर्त्याने पुराव्याची जुळवा-जुळव केली असून, ती अजित पवारांकडे सादर करणार असल्याची माहिती संबंधिताने दैनिक 'प्रभात'शी बोलताना दिली.

प्रीमियम कमी केल्याचा फायदा ग्राहकांनाच
पन्नास टक्के प्रीमियम देण्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा ग्राहकांनाच होईल, असा दावाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेला विरोध चुकीचाच
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपासोबत राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेली हातमिळवणी ही चुकीची असल्याचे पवार यावेळी म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, शिवसेनेच्या विरोधात भाजपाशी हातमिळवणी करणे चुकीचे आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी संबंधित ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post