सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी कोपरगावच्या गरीब मुलांना शंभर स्मार्ट मोबाईल वाटप केले.
PRESS MEDIA LIVE :
कोपरगाव - देशभरातील गरजूंना मदत करणारा दानशूर अभिनेता सोनू सुद ही ओळख देशात निर्माण करणारे सोनू सुद यांनी कोपरगावच्या गरीब मुलांना शंभर स्मार्ट मोबाईल भेट देवुन वंचित मुलांना करोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवून त्यांचे शैक्षणिक जीवन उज्ज्वल करण्यासाठी मदतीच्या माध्यमातून हातभार लावले आहे. कोपरगाव नगरपालिकेच्या शाळेमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी बॉलीवूडचे अभिनेते सोनू सूद यांनी आज शंभर विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांचे मोबाईलचे वाटप केले. त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.मुलांच्या हातात मोबाइल आल्यावर त्यांचा देशाची भावी पिढी शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी मोबाईल वाटप करण्यात आल्याचे सूद त्यांनी यावेळी सांगितले.
शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोद राक्षे यांच्या मैत्रीतुन हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक कुणाल पाटील, सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली, मुलगा इशांत व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रेणुका पवार या विद्यार्थिनींनी ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी कसे वंचित राहत आहेत व त्यांचे कसे शैक्षणिक नुकसान होते याचे विवेचन केले. अभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. सूद यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या जागेवर जात विद्यार्थ्यांना हितगुज करत मोबाईल चे वाटप केले.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोना काळात मुले पालकांकडे मोबाईल मागत होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पालक हतबल होते. पण ते त्यांच्या भावना मांडू शकत नव्हते असे अनेक कुटुंब आहेत, त्याच प्रेरणेतून मी हे कार्य केले आहे. मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे देशा बरोबर आई वडिलांची सेवा करावी. कोपरगाव करांचे माझे नाते वीस वर्षापूर्वीचे आहे. वीस वर्षापूर्वी येथील इंजिनिअरिंग कॉलेज ला माझा प्रवेश झाला होता मात्र काही कारणाने मी येथे येऊ शकलो नाही. अखेर आपल्या प्रेमाखातर मला येथे यावेच लागले, असेही ते शेवटी म्हणाले.