पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शेतकर्यांच्या प्रश्नांवर राळेगणसिद्धी येथे 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषण करणार
आहेत. दिल्लीत जागेसाठी अद्याप त्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ऐनवेळी राळेगणसिद्धीतच आंदोलन करण्याचे त्यांनी ठरविले आहे.
हजारे यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. आश्वासने देवूनही त्यांचे पालन होत नसल्याने अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलन दिल्ली येथे करण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र रामलीला मैदानावर परवानगी न मिळाल्यामुळे ते 30 जानेवारी रोजी गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आंदोलनास प्रारंभ करणार शेतकर्यांच्या प्रश्नांवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिला होता. त्यानुसार हे आंदोलन असणार आहेत.
आतापर्यंतच्या आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता हजारे यांनी आपली आंदोलने विशेष दिवसांचे निमित्त साधून सुरू केलेली आहेत. त्यामुळे यावेळीही हजारे 30 जानेवारी या हुतात्मा दिनापासून आंदोलन सुरू करणार आहेत. कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे, या प्रमुख मागण्यांसाठी हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. आपल्या आयुष्यातील हे शेवटचे आंदोलन असेल, असा निर्धारही हजारे यांनी व्यक्त केला आहे..