प्रकल्पाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने घेतला सल्लागार नेमण्याचा निर्णय.
PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी :
पुणे - महापालिकेकडून विकासकामांसाठी सल्लागार नेमण्यावरून कोट्यवधीची होत असलेली उधळपट्टी चर्चेचा विषय बनली असतानाच; आता सल्लागार नेमण्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या सुमारे 192 कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रियेनंतरची कामे तसेच प्रकल्पाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने आता सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे हा सल्लागार नेमण्यासाठी तब्बल 50 कोटींच्या प्रकल्पांसाठी काम केलेले तसेच महापालिकेची नोंदणी असलेले सल्लागार नेमण्याची अट घातली आहे. त्यामुळे प्रशासन ठराविक सल्लागारासाठीच हा निविदेचा घाट घालत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांत महापालिकेकडून मोठ्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची टूम काढण्यात आली आहे. जवळपास प्रत्येक प्रकल्पासाठी सल्लागार नेमून प्रशासनाकडून सल्लागार नेमले जात आहेत. सल्लगारांना देण्यात येणाऱ्या शुल्कावर राज्य शासनानेच मर्यादा घातल्या असल्या तरी,मर्जीतील सल्लागारांना जास्तीत जास्त काम देण्यासाठी महापालिकेत चढाओढ सुरू असते. असाच प्रकार कात्रज-कोंढवा रस्त्याबाबतही समोर आले आहे.
या रस्त्याचे काम सुरू होऊन सव्वावर्ष झाल्यानंतर प्रशासनाने आता पुन्हा या रस्त्याच्या कामासाठी पोस्ट टेंडर ऍक्टिव्हिटीसाठी व कामावर सुपरव्हिजनसाठी सल्लागार नेमण्याबाबत टेंडर नोटीस प्रसिद्ध केली आहे. यात टेंडर मनपा पॅनेलवरील तज्ज्ञ सल्लागार (तेही 50 कोटींच्या पुढील कामाचा अनुभव असलेला) असणे आवश्यक आहे, असे नमूद केले आहे.अशाप्रकारच्या अटीमुळे स्पर्धेला वाव राहात नाही म्हणून तत्कालीन आयुक्तांनी टेंडरमधील महापालिका रजिस्ट्रेशनची अट काढून टाकण्याचा निर्णय कार्यालयीन आदेशाद्वारे घेतला होता. असे असतानाही एखादा विशिष्ट सल्लागार डोळ्यासमोर ठेऊन टेंडर काढल्याचा संशय या प्रकरणामुळे निर्माण झाला असून ही अट तातडीने रद्द करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.
.