नव वर्षाचे स्वागत करताना पुणेकरांनी नियम आणि संयम पाळण्याची गरज
PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :
नववर्षांचे स्वागत करताना पुणेकरांनी नियम आणि संयम बाळगला पाहिजे. स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करून घरातच नववर्षांचे स्वागत करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःसह कुटूंबियांची काळजी घेण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
शहरात संचारबंदी लागू असल्यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्रित फिरता येणार नाही. त्याशिवाय रात्री अकराच्या आतमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नववर्षांचे स्वागत करताना नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विनाकारण भटवंâती, विना मास्क प्रवास, कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या विरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून तपासणी केली जाणार आहे. त्याशिवाय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा ६ हजारांवर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
चौका-चौकात नाकाबंदीला प्राधान्य
पोलिसांकडून हद्दीतील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यानुसार वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. विनामास्क प्रवास, कोरोना नियमावलीचे उल्लंघन, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणाऱ्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. विहीत वेळेनंतरही विनाकारण सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर येउन नागरिकांनी गर्दी करू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कोट-नागरिकांनी नववर्षांचे स्वागत करताना स्वयंशिस्त आणि संयम बाळगणे आवश्यक आहे. संचारबंदी सुरू असल्यामुळे चारपेक्षा जास्त नागरिकांना एकत्रित फिरता येणार नाही. कोरोना नियमावलीचे पालन करून नववर्षांचे घरात बसूनच स्वागत केल्यास गर्दी टाळता येणार आहे. पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे