दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना भेटा. जलसंपदामंत्री जयंत पाटील.
PRESS MEDIA LIVE : सांगली :
सांगली - भाजप सरकारने आणलेला कायदा कसा बरोबर आहे हे सांगण्यासाठी आज महाराष्ट्रात आणि उर्वरित देशात भाजपचे लोकं मोर्चा काढत आहे. इथे गल्लीत मोर्चा काढण्यापेक्षा दिल्लीत उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिले आहे. किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर येथील एका सभेत महाविकासआघाडीवर टीका करत कायदा कसा बरोबर आहे हे सांगितले होते, त्याला मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले.ते बापूसो शिंदे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टा या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील देखील उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, भाजपचे लोक आज म्हणतायेत की राष्ट्रवादी काँग्रेसला मार्केट कमिट्या वाचवायच्या आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो आम्हाला मार्केट कमिट्या नाही तर आमच्या शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवायचे आहेत. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी हा लढा आहे.यावेळी ते म्हणाले, आदरणीय शरद पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना एवढा मोठा हमीभाव दिला की, दिल्लीतले शेतकरी आजही म्हणतात पवार साहब ने जो किया, वो आजतक किसीने नहीं किया.
पुढे मंत्री पाटील म्हणाले, आजही एफआरपीचा कायदा अस्तित्वात आहे. कारण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. नवी व्यवस्था तयार होत नाहीत तोपर्यंत जुनी व्यवस्था मोडून काढू नये या मताचे आम्ही आहोत. आज देशातील सर्व गोष्टींचे खाजगीकरण केले जात आहेत. ते धनवानांच्या हाती जात आहे. ब्रिटिशांनी सर्व गोष्टी आपल्या हातात घेतल्या म्हणून तर आपण स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवलं. लोकांना संस्थांचा उपयोग व्हावा म्हणून तर स्व. इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीयकरणाची भूमिका घेतली. पण आज सत्ताधारी या संस्था मोठ्या भांडवलदारांच्या हाती देत आहेत.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, केंद्र सरकारला ग्रामीण भागातील पतसंस्था नकोत. सहकारी बँकांना परवानगी दिली जात नाही पण खाजगी संस्था उभ्या राहत आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील सहकार चळवळ बळकट करावी अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांना यावेळी केली.