कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलिसांनी एल्गार परिषदेस परवानगी नाकारली .
PRESS MEDIA LIVE : पुणे: मोहम्मद जावेद मौला.
गणेश क्रीडा, कला केंद्रात 31 डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याच्या परवानगीसाठी समितीने स्वारगेट पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. मात्र कायदा-सुव्यवस्था आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलिसांनी परिषदेला परवानगी नाकारली आहे.
कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला अनुयायी भेट देतात. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात 31 डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी समितीने स्वारगेट पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी चर्चा केली. कायदा-सुव्यवस्था आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेला परवानगी नाकारल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे.दोन वर्षांपूर्वी शनिवारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत भडकावू भाषणांमुळे अनेक विचारवंतांसह दिग्गजांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या परिषदेच्या आयोजनासाठी माओवाद्यांकडून पैसे आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी दाखल गुल्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे.