कार्यालयात उपस्थित नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या खूर्चीवर पुष्पगुच्छ ठेवून निषेध करण्यात आला.
PRESS MEDIA LIVE :
पिंपरी - महावितरणच्या प्राधिकरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी हे कधीही उपलब्ध होत नसल्याने पिंपरी चिंचवड इलक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे गुरुवारी (दि.3) गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. त्यांच्या खुर्चीवर पुष्पगुच्छ ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. ही बाब समजताच कार्यालयात धाव घेत चौधरी यांनी हा पुष्पगुच्छ स्वीकारत कामकाजात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
महावितरणच्या प्राधिकरण उपविभागीय कार्यालयात सकाळच्या सत्रात वीज ग्राहक आणि अन्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी उपलब्ध असणे अपेक्षित असताना गेली अनेक महिने चौधरी जागेवर नसल्याच्या तक्रारी आहेत.त्यानुसार गुरुवारी देखील चौधरी (दि.3)कार्यालयात उपस्थित नव्हते आणि त्यानंतर असोसिएशनने ही बाब वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर ठेवत आंदोलन केले. चौधरी यांना या आंदोलनाची माहिती मिळताच ते कार्यालयात आले. तोच पुष्पगुच्छ त्यांना देऊन कामकाजात सुधारणा करून नागरिकांच्या समस्या सोडवा अशी विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे केली. या कार्यालयातूनच महावितरणचे प्रादेशिक संचालक नाळे यांच्याशी संपर्क साधत, पिंपरी आणि भोसरी विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी एक बैठक आयोजित करण्याची मागणी केली. यावर सहमती दर्शवित प्रादेशिक संचालकांकडून चौधरी यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गिरीश बक्षी, कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव नितीन बोंडे, संजीव पाटील, नटराज बोबडे, महेश माने आदी सहभागी झाले होते.
याबाबत महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क न होऊ शकल्याने या आंदोलनाबाबत त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही