कडाक्याची थंडी असूनही शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढू लागली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पण जशी थंडी वाढते आहे तशी आंदोलक शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढत असल्याचे चित्र तेथे दिसून येत आहे. दिल्लीच्या चारही बाजूने शेतकरी तेथे गेले तीन आठवडे ठिय्या देऊन बसले आहेत.
पण आंदोलक शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी रात्री शेकोट्या पेटवून तेथे पारंपरीक नाच गाण्यांच्या कार्यक्रमात दंग झालेले दिसत आहेत. या आंदोलनामध्ये त्यांच्यात एकमेकांना मदतीचा हात देण्याची व एकमेकांबरोबर अधिक मिळून मिसळून वागण्याची एक नवीच उर्मी दिसून येत आहे. काल दिल्लीचा थंडीचा पारा 3.9 अंश सेल्सियस इतका होता. पण त्याही कडाक्यात तीन कायदे रद्द झाल्याशिवाय येथून हलणार नाही हा त्यांचा निर्धार कायम दिसून आला दिल्लीच्या सीमेवर काही आंदोलक पत्रकारही सामील झाले असून तेथून ते फेसबुक लाईव्हद्वारे रात्रीच्यावेळी शेतकरी छावण्यांमध्ये रंगलेले हे पारंपरिक गाण्यांचे कार्यक्रम लोकांना ऐकवत आहेत. तेथील साद्यंत वृत्तांत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना सादर केला जात आहे.
एवढेच नव्हे तर प्रसार माध्यमांमध्ये या आंदोलनाची गोदी मीडियाकडून जी बदनामी सुरू आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पंजाब बॉर्डरवरील शेतकऱ्यांनी या आंदोलनातील घडामोडींची माहिती आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता रोज एक स्वतंत्र दैनिकच छापून प्रसारित करण्याचे काम सुरू केले आहे.
पंजाबी भाषेतील हे वृत्तपत्र आंदोलनातील तरुण कार्यकर्त्यांनी सुरू केले असून त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फतच त्याचे वितरणही तेथे सुरू आहे. सध्या या आंदोलनामुळे दिल्लीकडे येणारी वाहतून अन्य पर्यायी मार्गावरून वळवण्यात येत असून सिंघू, औचंडी, पियाऊ मनियारी, साबोली, आणि मंगेश या दिल्लीच्या सीमा केंद्रावरील वाहतूक पूर्ण ठप्प आहे. नागरिकांनी आऊटर रिंगरोड, जीटीके रोड, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 या ठिकाणांवरून जाणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे.