मटका किंग

 मटका किंग चे स्वप्न बघणाऱ्या विनोद भगतला मुंबई   क्राइम कडून  झटका.

PRESS MEDIA LIVE : 

मटकाकिंग सुरेश भगतच्या हत्येनंतर मटक्याचा सर्व काराभार हाताळणारी त्याची पत्नी जया भगत हिला यमसदनी धाडून 'मटका किंग' व्हायचे स्वप्न बघणाऱया विनोद भगत याला मुंबई क्राईम ब्रँचने झटका दिला आहे. जया आणि तिची बहीण आशा यांच्या हत्येची सुपारी विनोदने दिली होती. आरोपींनी रेकी केली, प्लानिंग पण झाली, परंतु युनिट-9 च्या पथकाने हा गंभीर गुन्हा होण्यापासून रोखला.

18 डिसेंबर रोजी खारदांडा येथे एक इसम पिस्तूल, काडतुसे घेऊन येणार असून तो कोणाची तरी हत्या करण्याच्या तयारीत असल्याची खबर युनिट-9 ला मिळाली होती. त्यानुसार युनिट-9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक आशा कोरके, एपीआय कोरे, उपनिरीक्षक आंबवडे, रामदास कदम व पथकाने खारदांडा परिसरात सापळा रचून जावेद अन्सारी याला पकडले.त्यामुळे जावेदकडे फोटोबाबत कसून चौकशी करता त्या दोघींना मारण्याची सुपारी मिळाल्याचे जावेदने सांगितले. पोलिसांनी यूपीतल्या बिजनोर येथे जाऊन जावेदचे अन्य दोन साथीदार मकसुद कुरेशी आणि अन्वर दर्जी या आरोपींनादेखील पकडले. या तिघांना बिजनोर येथील रामवीर नरेश शर्मा याने जया व आशाच्या हत्येसाठी 60 लाखांची सुपारी देऊन 14 लाख आगाऊ रक्कम आणि शस्त्र आरोपींना देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी रामवीर यालादेखील बेडय़ा ठोकल्या, असे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी सांगितले.

रेकी केली पण पोलिसांनी उचलले

जावेद आणि त्याच्या साथीदारांनी घाटकोपर येथे राहणाऱया जया आणि आशाच्या घराची रेकी केली होती. तेथील फोटो, व्हिडीओ काढून दोघींना कसे मारायचे याचे प्लॅनिंगदेखील केले होते.

…म्हणून आशाला पण मारायचे होते

मटक्याचा सर्व व्यवसाय मिळवायचा असेल तर जयाला एकटीला मारून चालणारे नव्हते. तर या व्यवहाराची सर्व माहिती असलेल्या आशाला संपवणेदेखील गरजेचे होते. त्यामुळे विनोदने दोघींच्या हत्येची सुपारी दिली होती.



वाळकेश्वर व्हाया लंडनवरून मिळाली सुपारी

रामवीरकडे सुपारीबाबत विचारपूस करता सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या मामू याने जया आणि आशाच्या हत्येची सुपारी दिल्याचे त्याने सांगितले. तर मामूला वाळकेश्वर येथे राहणारा मटका किंग सुरेश भगतचा भाऊ विनोद याने सुपारी दिल्याचे तपासात स्पष्ट झाले. मग पोलिसांनी विनोदला पकडले. या गुन्ह्यात मामू वॉण्टेड असून उर्वरित पाच आरोपींना अटक करण्यात आली. वेळीच आम्ही या आरोपींना पकडल्यामुळे मुंबई होणारा गंभीर गुन्हा रोखता आल्याचे उपायुक्त अकबर पठाण म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post