कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाच्या हालचालींना वेग.
इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटी चे सत्र सुरू ठेवले
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाच्या हालचाली आता वेगावल्या असून, नव्या वर्षात नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटींचे सत्र सुरू ठेवले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील हे दोघेच याबाबत निर्णय घेणार आहेत. आताही पदांचे वाटप याच पद्धतीने होण्याची शक्यता आहे. मात्र अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे की कॉंग्रेसकडे हे अजूनही उघड झालेले नाही.गतवर्षी २ जानेवारी २०२० रोजी पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या होत्या. त्यावेळी भाजप आणि मित्रपक्षांकडून कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने सत्ता खेचून आणली होती. सध्या अध्यक्षपद कॉंग्रेसकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, महिला बालकल्याण समिती सभापतिपद स्वाभिमानीकडे, तर तीन सभापतिपदे शिवसेनेकडे देण्यात आली.
कोल्हापूर महापालिकेत कॉग्रेस नगरसेवकांची संख्या जास्त असली तरी महापौरपदासाठी राष्ट्रवादीलाही संधी दिली जाते. हाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेत वापरला तर अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा राहणार आहे.
कॉंग्रेसकडेच अध्यक्षपद राहिल्यास सरिता शशिकांत खोत आणि पांडुरंग भांदिगरे यांची नावे चर्चेत आहेत. माजी उपाध्यक्ष असलेले खोत यांना गोकुळसाठी संधी देण्याचेही घाटत आहे. अध्यक्षपद कोणत्या पक्षाला यावर उपाध्यक्षपदाची नावे बदलण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसकडे उपाध्यक्षपद आल्यास पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यासह अनेक नावे चर्चेत आहेत. रसिका पाटील किंवा विद्या विलास पाटील यांना महिला बालकल्याण समितीचे सभापतिपद मिळू शकते. बांधकाम समिती सभापतिपदासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांचा गट आग्रही असून या ठिकाणी रोहिणी आबिटकर किंवा वंदना जाधव यांच वर्णी लागू शकते. समाजकल्याण समितीसाठी कोमल मिसाळ आणि मनीषा कुरणे यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. मात्र शिक्षण सभापती असलेले प्रवीण यादव सहजासहजी राजीनामा देतील असे वाटत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
पी. एन. पाटील गटाला काय...?
कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे चार जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे या बदलामध्ये आपल्या गटाला काहीतरी पद मिळावे यासाठी पाटील यांचे समर्थक आग्रही आहेत. त्यामुळे याबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे