चित्कलायन : एक दीर्घ कविता..
संवाद - नवंवा ( गुरुवार ता. ३१ डिसेंबर २०२० )
PRESS MEDIA LIVE :
एक रविवार : एक गझल ' या माझ्या व्हिडिओद्वारे सुरू असलेल्या उपक्रमाला युट्यूब सह सर्व समाजमाध्यमांवर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.याचा मला मनस्वी आनंद आहे. रविवार ता.१४ जून २०२० पासून सुरू असलेला हा उपक्रम अर्थातच यापुढेही दर रविवारी सुरू राहणार आहेच. आता रसिकांच्या प्रतिसादामुळेच " चित्कलायन " या माझ्या दीर्घ कवितेचे मी १० सप्टेंबर २०२० पासून " एक आड एका गुरुवारी" व्हिडीओ करून युट्यूब वर प्रसारित केला आहे.त्यालाही आपणा काव्य रसिकांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.ही कविता १०-२४ सप्टेंबर,८-२२ऑक्टोबर,५ -१९ नोव्हेंबर, ३-१७-३१ डिसेंबर २०२० आणि १४-२८ जानेवारी आणि ४ फेब्रुवारी २१२१ अशा बारा भागात युट्यूबवर प्रसारित केली जाईल.
मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ' चित्कला ' या मथळ्याच्या अनेक कविता लिहिल्या. १९८३ ते १९९५ या काळामध्ये विविध नियतकालिकात व दिवाळी अंकात त्या प्रकाशितही झाल्या. 'चित्कला ' या नावाने आपला संग्रह यावा असे मला १९८३ पासूनच वाटत होते. मात्र दरम्यान १९८९ साली ख्यातनाम कवयित्री इंदिरा संत यांचा त्याच नावाचा संग्रह मौज द्वारे प्रकाशित झाला.त्यामुळे मी चित्कला ही दीर्घ कविता त्यापूर्वीच लिहीत असलो तरीही या संग्रहाचा बारसे मात्र मला ' चित्कलायन 'या नावाने करावे लागले. सुट्या सुट्या तुकड्यांनी प्रकाशित झालेल्या या माझ्या दीर्घ कवितेचा संग्रह यायलाही तब्बल बत्तीस वर्षे लागली.अक्षर मानव प्रकाशन,पुणे च्या वतीने तो २०१५ साली प्रकाशित झाला.
कालवश इंदिरा संत या प्रतिभावंत कवयित्रीलाही आपल्या संग्रहाला हे नाव द्यावे वाटणे आणि मलाही त्याच नावाची दीर्घ कविता त्याआधीपासूनच लिहावी वाटणे हा योगायोगही मला बहुमानाचा वाटतो हे नम्रपणे मी मान्य करतो.
' चित्कला ' या शब्दाचे अर्थ शब्दकोशात अनेक आहेत.सचेत तत्व, ज्ञानशक्ती ,चैतन्य, जीवनकरण, स्फूर्तिस्थान, प्रेरणास्थान या साऱ्याचाच अर्थ चित्कला असा आहे. ज्ञानेश्वरी मध्येही हा शब्द वापरलेला आहे.मानवी इतिहासात प्रेरणेचे महत्त्व अनादिकाळापासून आहेच आहे.कविता लेखनाची स्फूर्ती अनेक कारणांमुळे आणि त्या कारणाने कारणीभूत ठरलेल्या व्यक्तित्वांमुळे मिळत असते. या साऱ्यालाच मी 'चित्कला' संबोधून या कविता लिहित गेलो. याविषयीची सविस्तर भूमिका मी संग्रहाच्या प्रस्तावनेत आणि या व्हिडिओ संवादाच्या पहिल्या भागामध्ये हे मांडलेलीआहेच.
" श्वास थांबला की कलावंताचेही कलेवर होते. पण कलेवरालाही कलावंत अशी ओळख करून देत असते ती त्याची निर्मिती. म्हणूनच 'चित्कलायन ' ही दीर्घ कविता त्या निर्मितीच्या क्षणांनाच अर्पण...आपल्या प्रतिसाद व प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत...
स्नेहांकित...प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८ ५०८ ३० २९० )