मतदारांच्या नावा पुढे भाजप पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर.
राष्ट्रवादीचा गंभीर .आरोप
PRESS MEDIA LIVE : पुणे :
पुणे - शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादी अनेक मतदारांच्या नावांपुढे पत्ते नाहीत. दुबार नावे, तर काही मतदारांच्या नावापुढील फोन नंबर हे भाजप आमदार आणि संपर्कप्रमुखांचे आहेत. हे कसे होऊ शकते? भाजपने दि.1 नोव्हेंबर रोजी जे महानोंदणी अभियान राबविले, त्यातून हे प्रकार घडले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता रविवारी झाली. त्यानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत काकडे यांनी हा आरोप केला. यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार ऍड. वंदना चव्हाण, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, अभय छाजेड, संजय बालगुडे उपस्थित होते.यावेळी काकडे यांनी मतदार यादीतील घोळाची यादीच सादर केली. ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील 8 हजार 834 मतदारांच्या नावांपुढे पत्तेच नाहीत. तर काही मतदारांना फोनवरून संपर्क केला असता, तो नंबर भाजप पदाधिकाऱ्यांचा असल्याचे कळले. तसेच 2 हजार 251 मतदारांनी मतदार यादीमध्ये दुबार नावे आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
राज्यमंत्री कदम म्हणाले, 'राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. आर्थिक चणचण असतानाही करोना आणि अतिवृष्टीच्या काळात जनतेच्या मदतीला धावून आले. यांची जाणीव मतदारांना आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे.' ऍड. चव्हाण म्हणाल्या, 'महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी 'चॅलेंज' आहे. तिन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे.'