कोरोना मुळे उरूस रद्द करण्यात आला.
इस्लामपूर : गुलाबी गारव्याची थंडी आणि डिसेंबर महिना जवळ आला की, इस्लामपूरकरांना वेध लागतात ते संभुअप्पा उरसाचे. पण नेमके यावर्षी कोरोनामुळे हा उरूस रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे इस्लामपूरकर नागरिक हा उरूस "मिस' करत आहेत.
संभुअप्पा उरुसासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यातून भाविक येतात. सुमारे 350 वर्षांपूर्वी ज्या काळात अस्पृश्यता बोकाळली होती, हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेषाची बिजे पेरली जात होती. अशा काळात संभुआप्पा इस्लामपुरात वास्तव्यास आले. त्यांनी त्यांच्याही आधी 300 वर्षे होऊन गेलेल्या बुवाफन यांना गुरू मानले होते. कोल्हापूरला जाताना वाटेत ते इस्लामपुरात थांबले, ते कायमचे इथलेच झाले.हातमागावर कापड विणून तो विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. संभुआप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील, सत्पुरुष तर बुवाफन हे मुस्लिम समाजातील. त्यांना पुराण काळातील कबीर-कमाल या गुरुशिष्य जोडीचा पुनरावतार मानले जाते. बुवा म्हणजे साधू व फन म्हणजे फकीर. मानवता धर्माची स्थापना हेच त्यांचे कार्य असते. संभुआप्पा फक्त इस्लामपुरातच प्रसिद्ध आहेत असे नाही; नाहीत, तर मालगाव (ता. मिरज), शिरोळ (ता. हातकणंगले), इचलकरंजी, पेठवडगाव, काले, बेळगाव, कवलापूर येथेही त्यांना मानले जाते.
दोघेही मूळ मालगाव (ता. मिरज) येथील. खरं तर संत महात्म्यांना जात-धर्म नसतो. असतो तो एकच "मानवताधर्म'. याच धर्माचे पालन उरुण-इस्लामपूरचे नागरिक गेली 350 वर्षे गुण्यागोविंदाने करीत आहेत. इथला उरूस हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उरूस मानला जातो. सुमारे 15-20 दिवस चालणारा हा उरूस विशेषत्वाने बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कार्तिक पौर्णिमा हा श्री संभुआप्पांचा जन्मदिवस मानला जातो. पौष मास वद्य नवमी शके 1662 रोजी संभुआप्पांनी जिवंत समाधी घेतल्यानंतर त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी इरुबाई आणि पुत्र श्री बाबुआप्पा यांनी मठाचा कार्यभार पाहण्यास सुरवात केली. त्यांच्या काळापासूनच उरूस भरवण्याची प्रथा सुरू झाली. कार्तिक शुद्ध दशमीस पाच चांदण्या (भाग) असणारा नक्षीदार कापडी मंडप उभारून व गूळ (सध्या साखर) वाटून उरुसास सुरवात करण्याची प्रथा आजही जोपासली जाते. यावेळी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात. सर्वजण सन्मानपूर्वक आपली परंपरागत सेवा बजावतात व एकदिलाने मंडप चढवून आनंदोत्सव साजरा करतात.
मंडप उभारणीसाठी वापरले जाणारे मोठे लाकडी खांब म्हणजे विविध जातीधर्माच्या आधारावर उभारणाऱ्या एकतेच्या छत्राचे आधारस्तंभच होते. उरूसकाळात मठाधिपती परिवारातील कुटुंबीयांना "फकीर' केले जाते. पुढे कार्तिक पौर्णिमेपर्यंतचे सलग तीन दिवस लोक श्रद्धेने फकीर होतात. यावेळी त्यांच्या गळ्यात निळ्या रंगाची कफणी व हातात गुलाबी दोरा (अटी) बांधला जातो. प्रसाद म्हणून मातीच्या कुंड्यातून भात व आवळ्याचे लोणचे दिले जाते. कार्तिक पौर्णिमेला शहरात सर्व घरांमध्ये किमान पाच फकीर संभुआप्पाचे रूप समजून पूजले जातात. दक्षिणा दिली जाते.
तुलशीविवाहादिवशी श्री संभूआप्रा व बुवाफन यांच्या दोन्ही घुमटांना एकत्रित जोडणारे वस्त्र (धज) बांधण्याची प्रथा आहे. यात्राकाळात गलफ घालणे, दंडस्नान घालणे, पाच नारळांचे तोरण बांधणे, फकीर पुजणे, मलिदा, पेढे वाटणे याद्वारे यथाशक्ती भक्ती केली जाते.
फकीर करणे किंवा फकीर होणे ही मोठी सन्मानाची बाब असते. फकीर होण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातून लोक येतात. विविध धार्मिक विधींमध्ये माळी, शिंगाडे (चौधरी), पाटील, पवार, चांभार, शिंपी, हरिजन यांना विशिष्ट असा मान आहे. संदल (गंधरात्र) हा अत्यंत महत्त्वाचा विधी असतो. वळू होणे आणि फकीर होणे सन्मानाचे मानले जाते. ज्यांची इच्छा अथवा नवस पूर्ण झालाय असे लोक 5 दिवस घरी न येता सेवेत वाहून घेतात आणि फकीर होणारे नंतरचे काही दिवस साधुवृत्ती अंगीकारून कार्यरत राहण्याचा संदेश देतात. हे सर्व विधी आणि उपक्रम नागरिक मिस करत आहेत.