कार्तिकी निमित्ताने

 विठ्ठलाचे  ओवीरुपी स्वागत : कार्तिकी निमित्ताने.


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८५०८ ३०२९०)


गुरुवार ता.२६ नोव्हेंबर २०२० रोजी  'कार्तिकी एकादशी' आहे.आषाढी व कार्तिकी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य व संचित आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी आषाढी यात्रा होऊ शकलेली नव्हती.तब्बल आठ महिने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंदच होती.ती नुकतीच दिवळीपासून काही अटींचे पालन करावे या विश्वासावर सुरू केली आहेत. यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी राज्यातील कोणत्याही भागातून  पंढरपूरला दिंड्या - पालख्या येऊ नयेत असे आदेश विधी व न्याय विभागाने २० नोव्हेंबरला काढले आहेत.पंढरीत संचारबंदी आहे.अर्थात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा होत असताना  व तशी शक्यता दिसत असताना आपणच दक्षता घेणे हे आपले कर्तव्य आहे .प्रशासन जो निर्णय घेईल त्याचा आदर सर्वांनीच केला पाहिजे.

               २६ नोव्हेंबर हा 'भारतीय संविधान दिन ' आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला नागरिक म्हणून जसे अधिकार दिलेले आहेत तसेच नागरिक म्हणून काही मूलभूत कर्तव्येही सांगितलेली आहेत. ही कर्तव्ये कोणत्याही सुसंस्कृत समाजाने व व्यक्तीने पाळलीच पाहिजेत अशी आहेत.  राज्यघटनेने या कर्तव्य पालनाची जबाबदारी नागरिकांवर सोपवली असून त्याचे पालन करणे हे नागरिक म्हणून आपले अग्रक्रमी नैतिक कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या मनात काय चालले आहे ? त्याचा आत्मसंवाद वा भक्त संवाद कसा असेल याचा विचार केला.त्यातून विठ्ठलाचे स्वगत गवसले.शेवटी विठ्ठल हा सर्वसामान्यांचा आहे.तो सर्व सामान्यांच्या भाषेतच बोलतो.सर्वसामान्यांचे ऐकतो. आपणही त्याचे बोलणे ऐकणे हीच खरी वारी आहे. विठू लेकुरवाळा आहे ,जनीं जनार्दन हाच त्याचा गोतावळा आहे.त्याचे स्वगत मोठे आहे.पण आज कार्तिकीनिमित्ताने  त्यातील थोडेसे...


आषाढी कार्तिकी ,यंदा नाही वारी

कोरोनी संकट ,चराचरी  ! १!


तुमचे गाऱ्हाणे, ऐकतो नेहमी

आता ऐका माझे,चार शब्द ! २!


अठ्ठावीस युगे,विटेवरी उभा

आता मीच येतो,लोकांमध्ये ! ३!


अजुनी सुरूच ,कोरोनाचे भय

घ्यावी  रे काळजी ,आपापली  ! ४!


सारेच जपून ,करा व्यवहार

लावा मास्क मुखी, फिरतांना ! ५!


तोच देशभक्त,मानतो मी खरा

ज्याची पूर्ण श्रद्धा,संविधानी !६ !


आपल्या पायाने, आपल्या खर्चाने

 पंढरी शिवाय,येते कोण ? ! ७!


राजा पंढरीचा , सांगतो सदैव

मनाची पंढरी, शुद्ध करा ! ८!


टाळ्यांनी -थाळ्यांनी, कसा रे जाईल ?

कोणता विषाणू, सांगा मला ?! ९!


श्रद्धा आणि भक्ती,असावी डोळस

गळा दाबू नये,विवेकाचा ! १०!


विज्ञानाच्या मार्गी,सापडेल लस

कोरोनाचा नाश,नक्की आहे ! ११!


नेते होती जेंव्हा ,प्रतिमेत दंग

तेंव्हा देश होतो, विकलांग ! १२!


सत्य नी अहिंसा,खरी भारतीय

खोटेपणा - हिंसा ,परकीय ! १३!


वारकऱ्यांनो रे ,तुम्ही श्रध्दाशील

खरे भक्तिमार्गी ,माझे भक्त ! १४ !


आंधळा विश्वास ,नका ठेऊ कधी 

खड्यात घालते, अंधभक्ती ! १५ !


माझी दारे बंद , झाली तरी चाले

पण उघडाव्या ,शाळा आधी ! १६ !


ऑनलाईन हे ,बोलायला ठीक

शिक्षणाला आणा , लायनित ! १७ !


गेले पूर्ण वर्ष,कोरोनात गेले

धीर धरा जरा, येई लस !१८!


लॉक नी डाऊन, गरजेचे होते

पण योग्य रित्या, झाले नाही ! १९!


चुकीचे निर्णय,जनतेच्या माथी

त्याने होते माती ,देशाचीही ! २० !


सत्याच्या शोधाचा,इतिहास आहे

मात्र वर्तमानी,फेकाफेकी ! २१!


सत्ता संपत्तीची, लालसा अघोरी

राम ना वसतो, आसारामी ! २२!


सत्तेच्या साथीने,करून घोटाळे

देशाचे वाटोळे , कोणी केले ? ! २३ !


अशासाठी नाही ,निर्मिले मी जग 

मुद्दा एक आहे ,बदलाचा ! २४ !


मजवरी तुम्ही,असू द्यावी श्रद्धा

पण अंधश्रद्धा, तोडा मोडा !२५!


घसरे जीडीपी,शेतकऱ्या फास

होतो कासावीस, वारकरी ! २६ !


राजकारणाला ,नका ठेऊ नावे

केला बट्ट्याबोळ, धर्मांधांनी ! २७ !


माझ्या पूजेसाठी ,मंत्री - संत्री नको

विश्वाचा निर्मिक ,सरकारी  ? ! २८ !


देशाची काळजी, नाहीच कुणाला

विकाया काढला,अख्खा देश ! २९ !


माणसाचे असे ,माकड पाहुनी

येते माझ्या कळ, अंतर्यामी ! ३० !


करोडो हृदयी ,असे माझा वास 

लावा गळी फास ,शोषकांच्या ! ३१ !


भ्रष्ट्र धर्मांधांची, ठेचा वळवळ

करा चळवळ ,समतेची ! ३२ !


मुलांनो,बाळांनो,खरे व्हा ज्ञानार्थी

नका बनू फक्त,परीक्षार्थी ! ३३!


मला म्हणताना,विठ्या रे सावळ्या

बाजारात काळ्या ,उभे तुम्ही ! ३४ !


अदानी, अंबानी,गुणाकारे वाढे

खचे दारिद्र्यात,सामान्य ही ! ३५ !


निवडीची जीत,करून मॅनेज

जनतेला भोंदू  फसवती ! ३६ !


देशाची संपत्ती , विकोनिया टाकी

त्याचा फुका दंभ ,ओळखावा ! ३७ !


जातो रोजगार,वाढे महागाई

मनमानी चाले, निर्णयांची ! ३८!


बोलका पोपट,नाचावतो मोर

सामान्यांच्या गळी,फक्त दोर ! ३९!


नैतिकतेच्या जे,मारतात गप्पा

वागणे तयांचे , अनैतिक ! ४० !


देवाच्या नावाने,सत्ता मिळवती

त्यांची झाली आहे,भ्रष्ट मती !४१!


राष्ट्रपिता गांधी , शुरांचा आरसा

भ्याडांचा वारसा ,नथुरामी ! ४२!


काही काळ असे,अंधाराचे भय

परी नक्की होतो, सूर्योदय !४३!


जात - पात - धर्म,नाही मी निर्मिले

लबाडांनी सारे,भेद केले  !४४!


नोकऱ्या -उद्योग, जेथे वाढतात

सर्वार्थाने तीच ,महासत्ता !४५!


कोरोना विषाणू,गुंडाळेल गाशा

मनाचा कोरोना,त्यागा तुम्ही ! ४६ !


सामान्य भकास,बड्यांचा विकास

आत्मनिर्भरता , नसे अशी ! ४७ !


राजेशाही गेली,लोकशाही आली

जगाची भलाई,तिच्यामध्ये ! ४८ !


जनी जनार्दना ,दाखव ताकद

तुझ्या मागे उभा ,विठ्ठल हा ! ४९ !


कार्तिकीला दिला,मुद्दाम संदेश

भेटू पंढरीत ,आषाढीला !५० !


सांभाळून राहा,मागे मी आहेच

देऊ मूठ माती ,कोरोनाला ! ५१ !


 (लेखक समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली एकतीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)




---------------------------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post