महात्मा फुले जन आरोग्य


 महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 'कोरोना' रुग्णांना लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

PRESS MEDIA : पुणे :

पुणे  : ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनें’तर्गत कोरोना बाधित पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास काही रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

दरम्यान ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कोविड-१९ ‘ विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली.

जिल्ह्यातील काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. तथापि ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्यायत यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम हाती घेतलेली आहे.

या मोहिमेचा दुसरा टप्पा स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने अधिक प्रभावीपणे राबवा. मृत्यदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाच्या काळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत तसेच राज्य शासनाने ग्रंथालय सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधींना नॉन-कोवीड रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती उपलब्ध करुन द्यावी, स्थानिक आकाशवाणी केंद्र तसेच समाज माध्यमातून मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी, सणाच्या काळात नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे इत्यादी जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत आहे तसेच लोकशिक्षण,जनजागृतीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी कोरोनाबाधित रुग्णाचे होणार्‍या मृत्यूबाबत विश्लेषण करण्याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणणे, कोरोना विषाणूचा संसर्ग पसरणार नाही, यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे असे सांगितले.

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post