केंद्रीयमंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचे अपुरे स्वप्न साकार करणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
PRESS MEDIA LIVE : मुंबई :
मुंबई दि.18 - लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक; केंद्रीयमंत्री दिवंगत रामविलास पासवान यांनी दलित बहुजनांसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.त्यांच्याकडे राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय अनुभव प्रदीर्घ असल्याने त्यांचा संसदेत प्रभाव होता त्यांच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण झाला होता. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत दलित बहुजनांच्या चळवळीत राष्ट्रीय स्तरावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढणे कठीण आहे. दिवंगत रामविलास पासवान यांचे अपुरे राहीलेले स्वप्न साकार करूया असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
सांताक्रूझ पूर्वेतील कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात रिपब्लिकन पक्षातर्फ़े आयोजित केंद्रीयमंत्री दिवंगत रामविलास पासवान यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेत ना रामदास आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; आमदार कपिल पाटील; लोजपाचे शमीम हवा; रवी गरुड; रिपाइं नेते काकासाहेब खंबालकर ; सुरेश बारशिंग; दयाळ बहादूर; हरिहर यादव; ऍड.अभयाताई सोनवणे;जयंतीभाई गडा; चंद्रकांत कसबे; एम एस नंदा; प्रकाश जाधव; विवेक पवार; सुद्धार्थ कासारे;सोना कांबळे;बाळ गरुड; चंद्रशेखर कांबळे; रतन अस्वारे; किसन रोकडे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत केंद्रीयमंत्री रामविलास पासवान हे जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून पुढे आले. त्यांना आंबेडकरी चळवळींबद्दल प्रचंड आकर्षण होते.त्यांना आम्ही दलित पँथर च्या कार्यक्रमांना बोलावीत होतो. नंतर ते केंद्रात समाज कल्याण मंत्री झाले तेंव्हा मी राज्यात समाज कल्याण मंत्री होतो. त्यांच्याशी माझे कौटुंबिक जिव्हाळ्याचे सबंध होते. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा संसदेत लावण्यासाठी ; तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न 'किताब देण्यात तसेच बौद्धांना सवलती मिळवून देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंगांसोबत रामविलास पासवान यांचे मोठे योगदान होते. जेंव्हा जेंव्हा दलित आदिवासी बहुजनांचे प्रश्न असतील तेंव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्र भेट घ्यायचो. ऍट्रोसिटी कायदा मजबूत करण्याबाबत त्यांची महत्वाची भूमिका होती. आता प्रमोशन मध्ये रिझर्वेशन च्या कायद्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करीत होतो मात्र ते त्यांचे स्वप्न अधुरे राहिले ते आपण पूर्ण करूया असे सांगत ना रामदास आठवले यांनी दिवंगत रामविलास पासवान यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
महाराष्ट्रात केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष या दोन्ही पक्षात विचारांचे नाते होते. पासवान नेहमी म्हणत असत की रक्ताच्या नात्या पेक्षा विचारांचे नाते श्रेष्ठ असते. दिवंगत रामविलास पासवान यांच्या निधनाने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची जबाबदारी चिराग पासवान यांच्या पेक्षा जास्त रामदास आठवले यांची असल्याचे मत लोकजनशक्ती पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शमीम हवा यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार कपिल पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत दिवंगत रामविलास पासवान यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गायिका वैशाली शिंदे; मैना कोकाटे;आदी मान्यवर उपस्थित होते.