तातडीने प्रश्न सोडविण्याचे निर्देश.

 राज ठाकरेंच्या आणखी 2 मागण्या, उपमुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने प्रश्न सोडविण्याचे निर्देश

PRESS MEDIA : 



 

मुंबई : – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बचत गटामार्फत कष्ट करणाऱ्या महिलांचा रोजगार बुडाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महिला बचत गटातील सर्व महिलांचे कर्ज माफ करण्याची मागणी आज मनसेकडून करण्यात आली. तद्वतच बचत गटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून करण्यात येत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे

कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या घटकाला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील लाखो महिला या मागील अनेक वर्षांपासून कष्ट करुन स्वयंरोजगार निर्मिती करुन स्वतःच्या पायावर उभ्या राहत असतानाच कोरोनामुळे गेल्या ७-८ महिन्यात संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. या महिला बचतगटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज ते वर्षानुवर्षे नियमितपणे फेडत असताना सुद्धा सध्य्याच्या काळात या कर्जाची परतफेड करणे ही अशक्य होत आहे. यामुळे संबंधित महिलांचे कर्ज माफ करण्याचे निवेदन मनसेने अजित पवार यांना दिले आहे.

तथापि, मार्च २०१९ पासून पोलीस बांधवाना मिळणारे गृहकर्ज देणे बंद करण्यात आले आहे. त्याद्वारे २५०० जणांना हे गृहकर्ज मंजूर करण्यात आले असून सुद्धा प्रत्यक्षात देण्यात आले नसल्याने पोलिसांची आर्थिक तारांबळ होत आहे. यावरती तात्काळ पाऊले उचलून हे गृहकर्ज त्यांना मिळवून देण्याची मागणी सुद्धा मनसेकडून करण्यात आली आहे. मनसेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश अजित पवार यांनी गृहसचिव सीताराम कुंटे यांना दिले असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

दरम्यान, यापूर्वी राज ठाकरे यांना मुंबईचे डबेवाले भेटले होते आणि तात्काळ रेल्वेने त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली. जिमच्या बाबत तसेच घडलं होते. राज्यातील ग्रंथालये आज पासून सुरु करण्यात आली असून, त्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घेतला होता. यामुळे आता मनसेने केलेल्या वरील दोन मागण्या सुद्धा राज्य सरकार पूर्ण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post