कोणताही साहित्यप्रकार नवरसांतून निर्माण होत असतो.
प्रसाद कुलकर्णी.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :
इचलकरंजी ता.१८ ,सर्वांगीण सामाजिक समतेची जर उगवण करायची असेल तर मानवतेच्या प्रेमाची पेरणी करावी लागते. त्या प्रेमासाठी काळजातले शब्द सुत कातत राहावे लागेल व त्यातून भावनांच्या तलमपणाचे धागे विणावे लागतील. गझल हा काव्यप्रकार ते करत आलेला आहे व करत राहील.हा आशावाद ' मी जगण्याचा गंध मनाशी पकडत होतो,त्याचा दरवळ गझलेमधुनी वाटत होतो, गझला माझ्या तलम जगाला वाटत होत्या,काळजातले शब्द सूत मी कातत होतो " या शेरातून गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी मांडला.ते स्वराज इंडिया महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित ' गझल सांगोपांग ' या वेबिनारमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.प्रारंभी ललित बाबर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.आणि पाहुण्यांची ओळखही करून दिली.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले, रसिकांचे मनोरंजन करणारा आणि बौद्धिक भूक भागविणारा गझल हा काव्यप्रकार आहे.त्यात शब्दबंबाळता चालत नाही तर शब्दांचा नेमकेपणाने वापर करावा लागतो.उत्कृष्ठ रचना, तंत्रशुद्धता,छंदोबद्धता ही गझलेची वैशिष्टये आहेत.गझल कोणत्याही भाषेतील असली तरी तिला वृत्त,वजन,मीटर, छंद, यमक,अंत्ययमक सोडता येत नाही.कारण डोळ्यांना जशी भाषा असते तसे गझलेला व्याकरण असते.गझल वृत्तबद्ध व अन्य बंधनानी युक्त असल्याने तिच्यावर कृत्रिमतेपासून अनेक आरोप झाले.पण छंदोबद्धता हे मराठी पंत,संत आणि तंत काव्याचेही वैशिष्टय आहे.हे काव्य अस्सल आहे मग गझल कृत्रिम कशी असेल ?खरेतर प्रयत्न करूनही ज्यांना गझल लिहायला जमली नाही त्यांनी असे आरोप केले आहेत.त्यामुळे नव्याने गझल लेखन करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्यानी मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांची ' गझलेची बाराखडी ' अभ्यासावी.मराठी गझलेचा तो शास्त्रशुद्ध व पायाभूत अभ्यासक्रम आहे.सुरेश भट हे विजा घेऊन येणाऱ्या पिढीशी बोलणारे द्रष्टे कवी होते. नवी पिढी चांगल्या व सशक्त गझला लिहीत आहे हे सुचिन्ह आहे.पण त्याच वेळी केवळ तंत्रावर पकड असून चालणार नाही तर गझलेच्या गझलीयतवर हुकूमत मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो बुडून जातो तोच तरुन जातो,बुडल्याशिवाय तरणे नाही असे सुरेश भट म्हणत होते.गझल लिहिणार्यांनी त्याचे भान ठेवले पाहिजे.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, कोणताही साहित्यप्रकार नवरसांतुन निर्माण होत असतो.ती रसापूर्णता गझलकार अल्पक्षरात मांडत असतो.' नऊ रसांच्या आस्वादाने माझी भूकच नाही भागत, मीच दहावा रस होतो अन गझलेमधुनी जातो मांडत ".अशी मांडणी गझलकारच करू शकतो.तिच्या वेगळेपणामुळे व काळजात शिरण्यामुळे गझलेची लोकप्रियता हृदयप्रियता,कर्णप्रियता व नयनप्रियता सातत्याने वाढत चाललेली दिसते. ' गझल सांगोपांग ' या वेबिनारमध्ये प्रसाद कुलकर्णी यांनी गझलेचा इतिहास,तिची वैशिष्टये,तिची ताकद, तिचे वर्तमान कवितेतील योगदान व भविष्याची दिशा याची सखोल मांडणी केली.तसेच समारोपात आपल्या काही गझलाही सादर केल्या.या वेबिनरमध्ये देश - विदेशातून रसिक सहभागी झाले होते.