वायसीएम रुग्णालयाचा भरतीकडे स्टाफ नर्स ची पाट.
PRESS MEDIA LIVE : पिंपरी :
पिंपरी – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोविड प्रादुर्भावापूर्वी भरण्यात आलेल्या विविध पदांपैकी एकूण 24 पदांवर नियुक्ती केलेले उमेदवार रुजू झाले नाहीत. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, नियुक्ती रखडलेल्या 24 पदांवर वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. रिक्त राहिलेल्या 24 पैकी 21 पदे स्टाफ नर्सची असून, प्रशासनाला वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ही पदे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरावी लागली आहेत. येत्या बुधवारी (दि. 16) होणाऱ्या स्थायी समिती सभेच्या मान्यतेकरिता हा विषय ठेवण्यात आला आहे.
वायसीएम रुग्णालयात आवश्यक असलेली पदे सध्या मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात सहा महिन्यांच्या एकत्रित मानधन तत्त्वावर भरली जातात. यामध्ये स्टाफ नर्स, ब्लड बॅंक कौन्सिलर, एमएसडब्ल्यू, लॅब टेक्निशिअन, डायलेसिस टेक्निशिअन, डाटा एन्ट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशिअन, पुरुष कक्ष व स्त्री कक्ष मदतनीस या एकूण 97 पदांचा समावेश आहे. 11 डिसेंबर 2019 रोजी या तात्पुरत्या पद भरतीसाठी महापालिका प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. वरील भरतीमध्ये सर्वाधिक 66 पदे स्टाफ नर्सची होती.
दरम्यानच्या काळात या पदांकरिता लेखी परीक्षा घेऊन, ही पदे सहा महिन्यांच्या कालावधीकरिता भरण्यात आली. मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक उमेदवारांनी मधूनच काम सोडून दिले. तर निवड झालेले काही उमेदवार कामावर रुजूच न झाल्याने त्यांची एकूण 24 पदे रिक्तच राहिली. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिकेचा वैद्यकीय विभागावरील खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. तर अपुरे मनुष्यबळ भरताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे.
मानधन तत्त्वावर भरलेल्या 66 पैकी 21 स्टाफ नर्स, 5 फार्मासिस्टपैकी 1 तर तीन लॅब टेक्निशियन पैकी दोन लॅब टेक्निशियन पदावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे करोना प्रादुर्भावाच्या काळात ही पदे 24 पदे वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भरण्यात आली आहेत. या सर्व पदांचा सहा महिन्यांऐवजी 3 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर हा दोन महिने 12 दिवसांचा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे.
आकर्षक मानधनामुळे खासगी रुग्णालयाकडे ओढा
करोनाच्या काळात महापालिका अथवा राज्य सरकारच्या रुग्णालयात मिळणारे मानधन हे तुलनेत कमी आहे. करोनाच्या काळात डॉक्टर, स्टाफ नर्स यांसारख्या पदांची मोठी गरज भासू लागल्याने, अनेक खासगी रुग्णालयांनी मोठ्या रकमेचे आमिष दाखवत, डॉक्टर व नर्स या पदांची भरती करत आहेत. त्यामुळे घसघशीत रकमेमुळे अनेक जण खासगी रुग्णालयातील नियुक्तीला प्राधान्य देत असल्याचे सध्या चित्र आहे.