सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग


सांगली जिल्ह्यासह पश्चिम  महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब.

PRESS MEDIA LIVE : सांगली :

सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने उपचार सुविधा वाढवाव्यात, त्यासाठी प्राधान्याने निधी देऊ. कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचेही योगदान महत्त्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजयकुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुखे सांगलीतून सहभागी झाले होते.

ठाकरे म्हणाले, कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील, त्या तुम्ही होवू देवू नका. इतर देश कोरोनाचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करा. पंधरा दिवसांत चांगले परिणाम दिसतील. रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. कंटेन्टमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या. उपचार सुविधा वाढवा. प्राधान्याने निधी देऊ. कोरोना रुग्णांवर उपचार तसेच संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवा. मदत लागत असेल तर राज्य शासनातर्फे जिल्हा प्रशासनाला दिली जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडून येणार्‍या प्रस्तावांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल.

क्रीडा संकुल येथे 120 बेडची सुविधा, ऑक्सिजन टँकसाठीच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी सहमती दिली. सुविधा वाढवा, प्राधान्याने निधी देऊ, असे ठाकरे यांनी सांगितले. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देवून कुटूंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, यात घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का. त्यांचे आरोग्य कसे आहे. त्यांना न्युमोनिया सदृश्य काही लक्षणे आहेत का. घरात बाहेरून कुणी व्यक्ती आले आहेत. मास्क व इतर शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का. याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल. राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार, मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.

                      अ‍ॅन्टीजेन टेस्ट सरसकट नको

प्रधान सचिव (आरोग्य) व्यास म्हणाले, रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट सरसकट करायची नाही. हायरिस्क गणल्या गेलेल्या पण लक्षणे नसलेल्या व्यक्तींची रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी. लक्षणे असलेल्यांची आरटीपीसीआर टेस्ट करावी. नॉन कोरोना रुग्णांवर उपचारावेळी (शस्त्रक्रिया, डायलिसीस, केमोथेरपी, प्रसूती आदी) यावेळी डॉक्टरांना गरज वाटली तर रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी.

मिरज क्रीडा संकुल येथे 120 बेडची सुविधा निर्माण होत आहे. तिथे 20 आयसीयू बेड व 100 ऑक्सिजनेटेड बेड असणार आहेत. मिरज येथील जुने पॅथॉलॉजी विभागात ऑक्सिजनेटेड 60 बेडची सुविधा केली जात आहे. जिल्ह्यात 29 कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुविधा सुरू आहे. गरजेचेनुसार हॉस्पिटलची संख्या, कोरोना हेल्थ सेंटची संख्या वाढविली जात आहे, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. होते.

Post a Comment

Previous Post Next Post