उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांच्या दालनात कोरोना किलर उपकरण
PRESS MEDIA LIVE : पुणे :
जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध पद्धतीवर संशोधित "कोरोना किलर"हे मशीन देशभर मान्यताप्राप्त होत असताना आता महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे.
या मशीनचे संशोधन केलेल्या इंडोटेक या कंपनीचे भाऊसाहेब जंजिरे व विजयसिंह डुबल यांनी काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात कोरोना किलर या मशीनचे सादरीकरण केले. कोरोना व्हायरसला ही मशीन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती मंत्री उदय सामंत यांना दिली. त्यानंतर हे मशीन त्यांच्या जनता दरबारात बसविण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच सहयोग या संस्थेने बसविले आहे.
कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंत, असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्र व मशीन इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने ह्या मशीनची कार्यक्षमता प्रमाणित केली आहे.
निवासस्थानापासून ते सर्व व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही हवा पोहोचते तेथे हे आयान पोहचतात व कोरोना व्हायरस आणि इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगितले.