पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह.
मुंबई - पत्रकार पांडुरंग रायकर यांना रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या सहकारी मित्रांनी आणि नातेवाईकांनी केला आहे. कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पांडुरंगला खासगी रुग्णालयात शिफ्ट करता आलं नाही. प्रकृती खालावत गेली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सध्या कोरोनाच्या काळात रुग्णांना वेळेवर बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत. काही महिन्यांपूर्वी कबीर खत्री नावाच्या रुग्णाचाही बेड उपलब्ध झाला नाही म्हणून मृत्यू झाला आहे. खत्री यांच्या मुलाने १२ तास मुंबईतील विविध कोविड रुग्णालयांना संपर्क साधून बेडसाठी विनवणी केली.मात्र कुठेही त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. खत्री यांची ऑक्सिजनची पातळी खालावत होती. त्यांच्या मुलाने मुंबई महापालिकेच्या कोविड हेल्पलाईनवर फोन केला पण त्यांना मदत मिळाली नाही. खासगी हॉस्पिटला बेड उपलब्ध झाला परंतु रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबर फोन केले पण त्याठिकाणी कोणी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या गाडीने वडिलांना हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पण वेळ निघून गेली. कबीर खत्री यांचाही बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जीव गेला अशी बातमी स्क्रोलनं दिली होती.
कोरोनाच्या संकटात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसतं. शहरी असो वा ग्रामीण भागाची परिस्थिती सारखीच आहे. झिगिस्टा हेल्थकेअरचे सीएफओ मनिष संचेती यांच्या रेकॉर्डनुसार प्रत्येक १ हजार व्यक्तीच्या मागे फक्त ३ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्यामुळे केवळ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेकांचे प्राण जात असल्याच्या घटना घडतात. सरकारकडून रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते पण त्यातही समन्वयाचा अभाव आणि रुग्णवाहिकेची कमतरता प्रामुख्याने दिसून येते.
जून महिन्यात महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेने कोरोना संकटकाळात खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचे ठरवले. याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये रुग्णावाहिकेचा अभाव असल्याने लोकांचा मृत्यू होत असल्याचं त्यांनी सांगितले होते. याचिकेनुसार मुंबईत मार्च २०२० पर्यंत केवळ ३ हजार रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्यातील १०० रुग्णवाहिका कोरोना संकटकाळात नादुरुस्त असल्याने बंद पडल्या आहेत. शहरात कोरोनाचं संकट वाढत असताना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेकांचे जीव गेलेत असं याचिकेत म्हटलं होतं.
रुग्णवाहिकेचा अभाव असणाऱ्या अशाच काही घटना
मुंबईतील वाडिया रुग्णालयात वार्डबॉयचे काम करणारा तरुण हा डोंबिवलीतील भरत भोईर निवास येथील गोपाळ भवन येथे राहतो. त्याला कोरोना लागण झाल्याची लक्षणो आढळून आल्याने त्याची रुग्णालयात टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यानंतर या तरुणाने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयास संपर्क साधला. रुग्णवाहिका मिळण्यासाठी त्याने विनंती केली. पण त्याला रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर त्याने पायीच हॉस्पिटल गाठले.
सुधागड तालुक्यात १०८ रुग्णवाहिका बंद असल्याने आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने २५ ऑगस्ट रोजी पालीतील एका ५७ वर्षीय रुग्णाला हकनाक आपला प्राण गमवावा लागला होता. पालीतील समर्थ नगरमधील एका ५७ वर्षीय रुग्णास कोविड १९ मुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांना ताबडतोब पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णाला नेण्यासाठी १०८ नंबर रुग्णवाहिका बंद होती. मागील सहा ते सात दिवसांपासून इंजिनमध्ये बिघाड असल्याने ही रुग्णवाहिका बंद आहे, तसेच ऑक्सिजन नसलेली दुसरी कुठलीही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अखेर त्यांना त्यांच्या खासगी गाडीमधून ऑक्सिजनशिवाय रोहा येथे रुग्णालयात न्यावे लागले आणि तिथे गेल्यानंतर त्यांची प्राणज्योत मावळली.
एकीकडे शेकडो कोटींची उधळपट्टी सुरु असताना पुणे महापालिका सर्वसामान्य नागरिकांना रुग्णवाहिका पुरवू शकत नसल्याचे चित्र आहे. २० ऑगस्ट रोजी कोरोनामुळे घरातच मृत्यू झालेल्या ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह केवळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तब्बल दहा तास घरातच पडून होता.