पाऊस , खड्डे आणि मनस्ताप.
PRESS MEDIA LIVE. : पुणे : मोहम्मद जावेद मौला
पुणेकरांसाठी नित्याचेच झाले आहे. पावसाळ्यात पुण्यातील रस्त्यांवर नवीन खड्डे पडतात. मात्र, असे असूनही ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याची कामे करणे, ही पुणे महापालिकेची सवय झाली आहे. या “दिखाऊ’ रस्ते दुरुस्तीमुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत आहे.
मागील काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचत आहे. शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्याने शहरांतील अनेक भागांत पाणी साचले. यामुळे अनेकांच्या घरातदेखील पाणी शिरले. मध्यवर्ती भागांसह सातारा रस्ता, कात्रज, स्वारगेट, सिंहगड रस्ता, येरवडा आदी भागांतील रहदारीच्या चौकांमध्येदेखील पाणी साचले होते.
मागील वर्षी सप्टेंबरमध्येच शहरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रस्त्यांवर साचलेले पाणी पाहून नागरिकांकडून भीती व्यक्त करण्यात येत होती.सळधार पावसामुळे शहराच्या विविध भागांत वाहनचालकांची तारांबळ होते. मागील दोन दिवसांच्या पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचत आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत होते.
रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामध्ये खड्डे, तुटलेली ड्रेनेजची झाकणे, विकासकामांमुळे पडलेला राडारोडा, अर्धवट राहिलेल्या कामांमुळे साचलेले पाणी, बंद पथदिवे आदींची भर पडत आहे.