एक दोन नव्हे तब्बल 18 वर्षांनंतर शरद पवार पिंपरी चिंचवड पालिकेत
PRESS MEDIA LIVE : पिंपरी
पिंपरी – एक दोन नव्हे तर तब्बल 18 वर्षांनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाला भेट दिली. कोणतीही पूर्वसूचना न देता शरद पवार यांनी महापालिकेला भेट देऊन त्यांनी करोनाबाबतची स्थिती जाणून घेतली. यावेळी पवार यांनी करोनाची ट्रेसिंग, टेस्टिंग वाढविण्याच्या तसेच मृत्यू दर आणखी कमी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
सन 2002 साली शरद पवार हे तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत महापालिकेत आले होते. भोसरी, देहूरोड, चऱ्होली, दिघी या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या रेडझोनच्या प्रश्नासंदर्भात 2002 मध्ये महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस, शरद पवार, महापालिका आयुक्त अनिल डिग्गीकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती. त्यानंतर तब्बल 18 वर्षानंतर पवार हे महापालिकेच्या भवनात करोनाबाबतचा आढावा घेण्यासाठी आज आले होते.
शरद पवार यांच्या स्वागतासाठी पालिकेत महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, मयूर कलाटे, नगरसेविका मंगला कदम, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते.