तेलगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन.
PRESS MEDIA LIVE : मुंबई :
मुंबई – मनोरंजन क्षेत्रासाठी 2020 हे वर्ष अत्यंत दु:खदायक ठरत आहे. यावर्षी अनेक दिग्गज आपण गमावले आहेत. दरम्यान सिनेसृष्टीला धक्का देणारी आणखी एक घटना मंगळवारी घडली आहे. दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
जयप्रकाश रेड्डी हे तेलुगू चित्रपटामधील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेते म्हणून ओळखले जात होते. जयप्रकाश रेड्डी यांनी ब्रह्मपुत्रुडु या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ‘प्रेमिचुकुंदम रा’, ‘गब्बर सिंह’, ‘चेन्नाकेशवारेड्डी’, ‘सीथाया’ आणि ‘टेंपर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण दाक्षिणात्य कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दाक्षिणात्य कलाकारांसोबत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांनी देखील ट्विट करुन रेड्डींना आदरांजली वाहिली आहे. “जयप्रकाश रेड्डी गुरू यांचं निधन झाल्यामुळे तेलुगू चित्रपट आणि रंगमंच यांनी एक हिरा गमावला आहे. गेले कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि स्मरणात राहतील असे चित्रपट दिले. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत”, असं ट्विट नायडू यांनी केलं आहे.